मुंबई । घाटकोपर (प.) येथील गोळीबार रोडवर सध्या रस्ता बनविण्याचे काम सुरू असून हे काम करणार्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे शनिवारी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे या परिसरातील पाणी पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला. याच कंत्राटदाराच्या चुकीमुळे या गोळीबार रोडचे काम सुरू झाल्यापासून या रोडलगतच्या व रोडखालील जलवाहिनी फुटण्याच्या किमान 8-10 घटना घडल्या आहेत. त्यामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली आहे. मात्र पालिकेकडून या कंत्रातदारावर गंभीर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. तसेच या रस्ते कामाच्या ठिकाणी पालिकेच्या रस्ते खात्याचे अभियंते नियमित देखरेख करीत नसल्याचे दिसून येत आहे.
तीन महिन्यांपासून रस्त्याचे काम
गोळीबार रोड हा गेल्या दोन वर्षांपासून खड्डेमय झाल्याने व नागरिकांना आणि वाहनचालकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याने पालिकेने हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनविण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. या तीन महिन्यात या रस्त्याखालील विविधी एजन्सीच्या उपयोगिता, सेवा नीटनेटक्या करण्यासाठी अनेकदा खोदकाम करण्यात आले. एवढेच नव्हे तर आजही या रस्त्यावर मलनि:सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामाअंतर्गतच या कंत्राटदाराच्या जेसीबीद्वारे या रोडलगतची व रोडखालील 6 इंची जलवाहिनी 16 जानेवारी रोजी फोडण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांचा पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत काही तास बंद ठेवण्यात आला होता.
तीन इंची जलवाहिनी फुटली
तसेच आज शनिवारी सकाळी याच रस्त्याचे खोदकाम जेसीबीद्वारे सुरू असतानाही तीन इंची जलवाहिनी फुटली व मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. मात्र कंत्राटदार व जेसीबी चालक हे जणू काहीच झालेले नाही या गुर्मीत काम करीत राहिले तर दुसरीकडे या फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले. या जलवाहिणीद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास झाला. या कंत्राटदाराला चांगलीच तंबी देऊन त्याच्यावर मोठी दंडात्मक कारवाई करावी आणि त्याला धडा शिकवायला पाहिजे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.