हलगर्जीपणा करणाऱ्या डॉ. बोरोलेंवर गुन्हा दाखल करा

0

मयत शिवानी कोळीच्या वडीलांची पोलीस अधिक्षकांकडे मागणी
जळगाव – शहरातील धन्वंतरी सर्जिकल हॉस्पीटलमध्ये उपचार घेतल्यानंतर डॉक्टर जगदीश बोरोले यांच्या हलगर्जीपणामुळे शिवानी वय-6 या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना 11 रोजी घडली होती. दरम्यान, याप्रकरणी अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने लवकरात लवकर गुन्हा दाखल करून डॉ.बोरोलेंना अटक करावी, अशी मागणी मयत शिवानीचे वडील आनंदा कोळी यांनी पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यातील नेरी दिगर येथील शिवानी आनंदा कोळी या चिमुकलीवर डॉ.जगदीश बोरोले यांच्या रूग्णालयात उपचार सुरू होते. हॉस्पीटलच्या बिलापोटी त्यांनी 35 हजार रूपये देखील अदा केले होते. दरम्यान, चिमुकलीचा 11 रोजी मृत्यू झाला. डॉक्टरांनी मुलीकडे जाणून बुजून लक्ष दिले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. जिल्हापेठ पोलिसात याबाबत आम्ही तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांनी नोंदवून घेतली नाही. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर डॉ.बोरोले हे आम्हाला डॉक्टर युनीयनचा धाक दाखवित आहे. त्यामुळे डॉ.जगदीश बोरोलेंविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन आनंदा कोळी यांनी पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांना दिले आहे. आनंदा कोळी यांनी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांची भेट घेवून त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. ना.महाजन यांनी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. ना.महाजन व माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांना देखील कोळी कुटूंबियांनी निवेदन दिले आहे.