हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : वरणगाव मुख्याधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी सुनावले खडे बोल !

0

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी सायंकाळी अचानक भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी कंटेन्मेंट झोनमधील चित्र पाहून त्यांनी संताप व्यक्त करीत मुख्याधिकारी यांची चांगलीच झपाई केली. लोखंडी पाईप व त्या ठिकाणी लागलेले बॅनर पाहताच जिल्हाधिकारी संतप्त झाले. अशीच व्यवस्था जर या ठिकाणी राहिली तर रुग्ण घराबाहेर पडण्याची दाट शक्यता असून संपूर्ण परीसर कोवीड 19 पॉझीटीव्ह झाल्याशिवाय राहणार नाही व असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी बजावले. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय यांनी कागदोपत्री व देखावासाठी, फोटोसेशन म्हणून काम न करता मनापासून व पूर्णवेळ काम केल्याशिवाय ही कोविड संसर्गजन्यरोगाची साखळी आपण तोडू शकत नाही, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले उपस्थित होते.

कंटेन्मेंट झोनची केली पाहणी
अक्सा नगर, राम पेठ येथील कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण राहत असलेल्या परीसराची जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली. त्या ठिकाणची परीस्थिती पाहून नाराजी व्यक्त केली. परीसराची काळजी अत्यंत गंभीरपणे घ्या, असे निर्देश देऊन मुख्य अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. मुख्याधिकारी यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे त्यामुळे मुख्याधिकारी यांनी कामात हलगर्जीपणा न करता ंटेन्मेंट झोन कडे स्वतः लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. निलेश चौधरी यांच्या सेवाभावी संस्थेच्या कोरोना विषयी करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे, सहाय्यक निरीक्षक संदीप बोरसे, माजी नगराध्यक्ष अरुणाबाई इंगळे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, गणेश धनगर, वैशाली देशमुख, समाधान चौधरी, इरफान पिंजारी आदी उपस्थित होते.