भुसावळ। भुसावळ नगरपालिका हि नाशिक विभागात ‘अ’ वर्ग प्राप्त आहे. मात्र गेल्या 10 ते 12 वर्षांपासून पालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. मुलभूत नागरी सुविधा नागरिकांना देताना सध्या वेळोवेळी अडचणी येत आहेत. मक्त घेण्यासाठी कुणीही कंत्राटदार तयार होत नाही, ही वस्ुतस्थिती आहे. त्यातच भरीसर म्हणून कर्मचारी संख्या देखील तोकडी आहे. तेव्हा अशा हलाखीच्या परिस्थितीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करण्यासाठी मोठा खर्च लागतो. हा खर्च पालिकेस पेलावणारा नसल्यामुळे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तंतरीत करावे अशी मागणी भाजपा वैद्यकिय आघाडी प्रमुख तथा पालिका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. नि.तु. पाटील यांनी केली आहे.
रस्ते दुरुस्तीचा खर्च वाचणार
शहरात कराचा भरणा करणार्या नागरिकांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे पालिकेच्या करवसुलीचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे. पालिकेला पथदिवे, पाणीपुरवठा आदी बाबींवर सर्वाधिक खर्च करावा लागतो. त्यातच शहराला ग्रामिण भाग आणि इतर तालुक्यांतून जोडणारे प्रमुख रस्तेही पालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. मुळात यावलरोड, जळगावरोड, वरणगावरोड, खडकारोड, जुना सातारा रोड, आरपीडी रोड आणि जामनेररोड आदी रस्त्यांपासून पालिकेला कवडीचे उत्पन्न नाही. या रस्त्यांवरुन अवजड वाहतूक होत असल्याने ते वारंवार खराब होतात. त्यांच्या दुरुस्तीवर नाहक खर्च करावा लागतो. हा खर्च वाचून शहरातील इतर रस्त्यांसाठी याचा वापर होऊ शकतो असे नमूद केले आहे. डॉ. पाटील यांनी निवेदनाच्या प्रती मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांसह जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि आपले सरकार पोर्टलवर पाठवण्यात आल्या आहेत.