जयपूर। पत्नीला तोंडी तलाक दिल्यानंतर हलालाच्या नावाखाली मित्रांसोबत रात्र घालवण्यासाठी पतीने विवश केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पीडित महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना केली आहे. जयपूरमधील आमेर रोडवरील 40 वर्षांच्या एका महिलेचा पती ठेकेदारी आणि मालमत्तेच्या दलालीचं काम करतो तसेच त्याला दारू आणि जुगाराचंही व्यसन आहे. त्याची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असल्यानं पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असत. जवळपास 9 महिन्यांपूर्वी त्या ठेकेदारानं स्वतःची दोन मुले आणि कुटुंबीयांसमोर स्वतः पत्नीला तोंडी तलाक दिला. त्याच्या दोन दिवसांआधीच त्याने कुटुंबीयांसमोरच काही कागदपत्रांवर पत्नीच्या अंगठ्याचे ठसे घेतले होते.
तलाकनंतरही ती पीडित महिला पतीच्या घरीच राहत होती. मात्र, एक दिवस तो स्वतःच्या मित्रांसमवेत जुगार खेळत होता. त्यावेळी मित्रांनी त्यांच्याशी पैज लावली की, जर त्याचा जुगारात पराभव झाला, तर एका रात्रीसाठी स्वतःच्या पत्नीला मित्रांकडे पाठवेल. ठेकेदार जुगारत पैज हरला आणि त्यानं पत्नीला पुन्हा निकाह करण्याच्या नावाखाली एका फार्म हाऊसवर नेले. तिथे त्याचा मित्र पहिल्यापासूनच उपस्थित होता. त्यानंतर दोन्ही मित्र बसून दारू पिऊ लागले आणि त्याने पत्नीला दिलेल्या ज्युसमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. त्यामुळे पत्नी ज्यूस प्यायल्यानंतर बेशुद्ध झाली. त्याच वेळी त्या दोन मित्रांनी पत्नीवर अत्याचार केले आणि ठेकेदाराने त्याचा एक व्हिडिओही बनवला. मध्यरात्री पत्नी शुद्धीवर आल्यानंतर मोठमोठ्याने ओरडली. मात्र, दोन्ही मित्रांनी तिला धमकावून गप्प केले.
न्यायासाठी पंतप्रधान मोदींकडे
दुसर्या दिवशी सकाळी ठेकेदार पत्नीला घेण्यासाठी फार्म हाऊसवर आला. त्यावेळी त्याने पत्नीला सांगितले की, तुला पुन्हा स्वीकारण्यासाठी हलाला गरजेचा होता. शरीयतमध्ये हलाला आवश्यक असतो. ठेकेदार पत्नीला म्हणाला, आता तू दुसर्यासोबत एक रात्र घालवली आहेस. ठेकेदाराने पत्नीला व्हिडिओही दाखवला आणि तो पत्नीशी जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करू लागला. एकादिवशी पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे रीतसर तक्रार केली. मात्र, पोलिसांनी हे धार्मिक प्रकरण असल्याने तक्रार घेण्याचे टाळले. पत्नीवर मुस्लीम समाज पतीविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी आता दबाव टाकत आहेत. त्यामुळे त्या पीडित महिलेने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच मदतीची याचना केली आहे.