भुसावळ/मुक्ताईनगर : अॅड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खासदार रक्षा खडसे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. मुक्ताईनगरातील गुन्हेगारी संदर्भात आपण आयजी व पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. प्रशासनाने घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करावी व हल्लेखोरांच्या पाठीमागे असलेल्या शक्तींचा पोलिसांनी शोध घेवून कठोर कारवाई करावी, असेही त्या म्हणाल्या. मुक्ताईनगर शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून पोलिस प्रशासनाने गांभीर्याने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. दर आठ दिवसांनी या शहरात अप्रिय घटना घडत आहे. शहरात महिलांची सुरक्षा महत्वाची असून राजकारणात वाद, आरोप-प्रत्यारोप होत असतात मात्र त्यासाठी थेट हल्ला चढवणे योग्य नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली.