पिंपरी : अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्या गाडीवर शुक्रवारी (दि. 4) गुजरातमध्ये झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसतर्फे शनिवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सरचिटणीस सजी वर्की, श्यामला सोनवणे, बिंदु तिवारी, शोभा मिरजकर, संग्राम तावडे, युवक काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, सुदाम ढोरे, राजेंद्र वालिया, मयुर जयस्वाल, क्षितीज गायकवाड, वीरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे लक्ष्मण रुपनर, अनिरुद्ध कांबळे, सौरभ शिंदे, वसंत मोरे आंदोलनात सहभागी झाले होते. गुजरातमधील पूरग्रस्त बनासकांठा जिल्ह्यात धानेरा येथील नागरिकांना भेटण्यासाठी शुक्रवारी राहुल गांधी गेले होते. त्यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्या मोटारीवर दगडफेक केली. यामध्ये सुदैवाने राहुल गांधी यांना कोणतीही इजा झाली नाही. परंतु, त्यांच्या मोटारीच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.