राहीमाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रम
नवी सांगवी : जुनी सांगवीतील राहीमाई महिला प्रतिष्ठान आणि जे.डी. ग्रुप यांच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू आणि तिळगूळ वाटप कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सुमारे सहा हजाराहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे उपस्थित होत्या.
शारदा सोनवणे, उषा मुंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संतोष ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेवक हर्षल ढोरे, मनोहर ढोरे, युवा नेते जवाहर ढोरे आदी उपस्थित होते. शिवलिंग किणगे, संतोष ढोरे, रामकृष्ण राणे, सत्यम ढोरे, प्रथमेश उथळे, नारायण हिरवे, आदिती निकम यांना विविध क्षेत्रात नैपुण्य, तसेच निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
महिलांनी ओळख तयार करावी!
शैलजा मोरे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून माई ढोरे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणात सक्रीय आहेत. महिलांची एवढी मोठी गर्दी हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करावे. महिलांनी आपली ओळख तयार केली पाहिजे. आज महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला उद्योग, व्यवसायात उतरल्या आहेत. त्यांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी, तर जवाहर ढोरे यांनी आभार मानले.