हळदीच्या दिवशीच नवरदेवाचा खून ; दोन महिलांसह एकास जन्मठेप

0

अमळनेर न्यायालयाचा निकाल ; अडावदाच्या आरोपींना अखेर शिक्षा

अमळनेर (प्रतिनिधी)- हळदीच्या दिवशीच नवरदेवाचा खून केल्याप्रकरणी चोपडा तालुक्यातील अडावद येथील दोन महिलांसह एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायालयाचे न्या.राजीव पी.पांडे यांनी बुधवारी सुनावली. 22 मे 2016 रोजी मयत गणेश प्रल्हाद खंबायत याचे लग्न ठरले होते. त्यानिमित्त अडावद येथे 19 मे रोजी हळदीचा कार्यक्रम सुरू असताना या कार्यक्रमात नाच गाणे साडे आठ ते 11.30 पर्यंत सुरु होते. यावेळी शेजारी राहणारे चुलत भाऊ तुकाराम काशिनाथ खंबायत, पत्नी रेखाबाई तुकाराम खंबायत यांच्यात वाद सुरु होता. यावेळी मयत गणेशचा मामेभाऊ किशोर सूर्यवंशी भांडण सोडवत असताना किशोर याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर धारदार चाकूने आरोपी तुकाराम याने वार केला. किशोरने स्वतःचा बचाव केल्यानंतर नवरदेव गणेश देखील भांडण सोडविण्यास गेला असता रेखाबाई, तिची आई सुशीलाबाई यांनी गणेशचा हात पकडून दोघांनी घरात ओढले व दरवाजा बंद केला. त्यावेळी किशोरने गणेशचा भाऊ हिरालाल यास आरोळी मारली. यावेळी बंद घरात हिरालालने लाथ मारून दरवाजा उघडला असता रेखाबाई व सुशीलाबाई या दोघांनी गणेशचे हात घट्ट पकडून ठेवले होते. तर तुकाराम याने धारदार चाकूने गळ्यावर गणेशवर वार करीत चाकू आरपार केला. त्यात गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाला उचलून दवाखान्यात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. रेखाबाई हिचे व गावातील देवानंद बलदेव कोळी याच्यासोबत अनैतिक संबंध होते. ही माहिती नवरदेव गणेश यास माहिती होती. आरोपी गणेश हा बदनामी करेल या धाकाने तुकाराम व रेखाबाईची आई सुशीलाबाई अरुण बरडे (रा.साकेगाव, ता.भुसावळ) यांनी भांडणाचे नाटक करून गणेश यास घरात बोलावून त्याला जिवंत मारले. यात सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील किशोर बागुल मंगरुळकर यांनी युक्तिवाद केला. त्यात महत्वाचे साक्षीदार म्हणून प्रत्यक्षदर्शी पाहणारे साक्षीदार हिरालाल , किशोर सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी, तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, चाकू काढून देणारे पंच व इतर लोकांची साक्ष महत्वाची ठरली. यात घटनेत आरोपी तुकाराम, रेखाबाई तुकाराम खंबायत व सुशीला बरडे यांना कलम 302 मध्ये जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व कलम 324 मध्ये एक वर्ष शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा सुनावण्यात आली.