हवाई दलांच्या संयुक्तयुद्ध अभ्यासात भारत

0

नवी दिल्ली । जगातील बलाढ्य देशांच्या हवाईदलांचा समावेश असलेल्या संयुक्त युद्ध अभ्यासात भारताचे हवाईदलही सहभागी होणार आहे. हवाईदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वैमानिक इस्त्रायलमध्ये होणार्‍या ब्ल्यू फ्लॅग एक्सरसाईजमध्ये सहभागी होणार आहेत. इस्त्रायलमध्ये होणार्‍या हवाई दलाच्या या संयुक्त युद्धाभ्यासात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, ग्रीस, इटलीसह भारताचा समावेश आहे.

विशेष म्हणझे यानिमित्ताने भारत पहिल्यांदाच इस्त्रायलमध्ये होत असलेल्या युद्ध अभ्यासात सराव करणार आहे. इस्त्रायलमध्ये होणार्‍या या संयुक्त युद्ध अभ्यासाची संपूर्ण माहिती उघड करण्यात आली नसली तरी हा युद्ध अभ्यास हवाई दलांच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि किचकट संयुक्त युद्ध अभ्यास मानला जात आहे. या युद्ध अभ्यासात भारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि चीनला स्थान देण्यात आलेले नाही. यामध्ये भारताची कोणती विमाने सहभागी होणार आहेत, याची माहिती देण्यात आली नाही. या युद्ध अभ्यासात मानवरहित हॉरेन एरियल व्हेईकल यात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी भारतीय हवाई दलाने अमेरिकेतील रेड फ्लॅग एक्सरसाइजमध्ये सहभागी घेतला होता. भारतीय सैन्याने मे 2016 मध्ये अलास्कामध्ये संयुक्त युद्ध अभ्यास केला होता. यामध्ये भारताची 4 सुखोई 30 एमकेआय, 4 जॅग्वार विमाने आणि दोन आयएल 78 मिड एअर टँकर सहभागी झाले होते. भारताने फेब्रुवारी महिन्यात क्षेपणास्त्रांसाठी इस्त्रायलशी करार केला आहे. भारताची सुरक्षा संशोधन आणि विकास संस्था आणि इस्त्रायलची एअरक्राफ्ट इंडस्ट्री संयुक्तरित्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करणार आहे. त्याकरिता झालेल्या उभय देशांमध्ये सुमारे 17 हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. त्यानुसार जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांची निर्मिती होणार आहे. ही क्षेपणास्त्रे भारतीय लष्करासाठी असतील.

नरेंद्र मोदी इस्त्रायलला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात इस्त्रायलचा दौरा करणार आहेत. उभय देशांमध्ये 1992 मध्ये द्विपक्षीय संबंध जोडल्यानंतर भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलाच इस्त्रायल दौरा आहे. मागील काही वर्षांपासून इस्त्रायल भारताला लष्करी साहित्य आणि हत्यारे पुरवणारा प्रमुख देश बनला आहे. भारताने इस्त्रायलकडून यूएवीपासून (मानवरहीत हवाई वाहने) अनेक छोट्या मोठ्या हत्यारांची खरेदी केली आहे. भारत वापरत असलेल्या रशीयन बनावटीच्या लढाऊ जेट्स विमानांचे तंत्रज्ञान पुरवण्याचे कंत्राट इस्त्रायलला मिळाले आहे. दोन्ही देशांनी गुपचुपपणे विशेष तज्ज्ञांचा समावेश असलेल्या छोट्या छोट्या गटांच्या माध्यमातून अनेक वेळा सराव केले आहेत. पण, मोठ्या स्वरुपातील लष्करी युद्धाभ्यासासाठी दोन्ही देश प्रथमच एकत्र येणार आहेत. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्यावेळी आपात्कालीन परिस्थितीत इस्त्रायलने भारताला हत्यारांचा पुरवठा केला होता.