जयपूर – गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्याच्या तळांना लक्ष केले जात आहे. दरम्यान आज राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे.
महिनाभरापूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. सीआरपीएफ जवानांचा हा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात होता. त्यावेळी दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. यानंतर भारतीय हवाई दलाकडून एअर स्ट्राईक करत बालकोट परिसरातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना लक्ष करण्यात आले होते.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले होते. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे भारतीय हवाई दलाच्या रडारने टिपले होते. यानंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.