नवी दिल्ली । 14 ते 18 फेब्रुवारी 2017 या कालावधीत बंगळुरू येथे भारतीय हवाई दलामार्फत एका विशेष एरो इंडिया शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोमध्ये पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाकडे उपलब्ध असणार्या लढावू विमानांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या विमानांमध्ये असणार्या तंत्रज्ञानामुळे अंतराळात विहारताना पृथ्वीवरील शत्रूंचा अंदाज घेण्याची क्षमता यात आहे. यापूर्वी नुकतेच 26 जानेवारीच्या दिल्ली परेडमध्ये या विशेष लढावूंचे प्रदर्शन करण्यात आले होते. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सिस्टिमद्वारा हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. 14 फेब्रुवारीपासून हे अत्याधुनिक लढावू विमान भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय हवाई दलाचा समावेश जगातल्या पहिल्या पाच देशांमध्ये होणार आहे.
सध्या भारताकडे रशियन, इस्त्रायल बनावटीची विमाने आहेत. मात्र, नव्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत भारतीय हवाई दल चीन आणि पाकिस्तानच्याही मागे असल्याचे मानले जाते. पाकिस्तानने रशियन बनावटींची विमाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतली आहेत, तर चीन नेहमीच शस्त्रास्त्रांबाबत अग्रेसर आहे.
ब्राझीलकडून विमानांची खरेदी
या सुविधांकरिता 2008 मध्ये भारताने ब्राझीलकडून विशेष विमानांची खरेदी केली होती. यात लढावू, भेदक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याकरिता सुमारे 2200 कोटी रुपयांची गुंतवणूक भारताने केली आहे. याशिवाय शत्रूच्या विमानावर बारकाईने लक्ष ठेवण्याकरिता एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम या तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे. या योजनेत 5100 कोटी रुपयांची गुंतवणूक फक्त आठ विमानांकरिता करण्यात आली आहे. 2024 पर्यंत भारतीय हवाई दल अजून सशक्त होईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्तकेला आहे.