लाहोर: कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानची तिळपापड झाली होती. त्यानंतर सर्वच बाजूने पाकिस्तानला तोंडावर पडावे लागले. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार तोडण्याची भूमिका घेतली. आता पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात आले आहे. परंतु पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी यावर युटर्न घेत अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. प्रत्येक बाबींवर विचार केल्यानंतर याबाबत निर्णय पंतप्रधान घेतात असे म्हणत त्यांनी याविषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्याचा मुद्दा कॅबिनेटच्या बैठकीदरम्यान चर्चेत आला होता. परंतु यावर अंतिम निर्णय पंतप्रधान इम्रान खान घेणार असल्याचे कुरैशी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान सराकरमधील मंत्री फवाद चौधरी यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये पाकिस्तान भारतासाठी आपली हवाई हद्द वापरू न देण्यावर, तसेच अफगाणिस्तान भारत यांच्यात सुरू असलेल्या व्यापारासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करू न देण्यावर विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने फेब्रुवारी महिन्यात आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली होती. त्यानंतर १६ जुलै रोजी पुन्हा एकदा पाकिस्तानने आपली हवाई हद्द खुली केली होती.