हवाई हल्ल्यात ईसिसचा खतरनाक अतिरेकी ठार

0

मोसुल : जगातील सर्वात क्रुर अतिरेकी संघटना म्हणून ओळखल्या जाणार्‍या ईसिसचा डेप्युटी कमांडर अयाद अल-जुमाईली ठार झाला आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार पश्‍चिम इराकमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात अयाद अल-जुमाली ठार झाला आहे.

ईसिसचा डेप्युटी कमांडर अयाद अल-जुमाईली हा अबू याहया या नावानेही ओळखला जात होता. अतिरेकी अबू याहया ईसिसचा युध्द विभाग संभाळत होता. सीरियामध्ये हवाईदलाने अनेक हवाई हल्ले केल्याची माहिती इराकच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे.

या हवाई हल्ल्यांमध्ये सीरियाच्या सीमेवरील अल-कईम परिसरात अबू याहया ठार झाला. परंतू अमेरिका नेतृत्व करत असलेल्या विरोधी गटाने अजून अतिरेकी अबू याहयाच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. अतिरेकी अबू याहयाकडे अंतर्गत सुरक्षा विभागही देण्यात आला होता. या विभागाचा प्रमुख हा संघटनेचा प्रमुख अल-बगदादीशी थेट संपर्कात असतो. हाच विभाग अतिरेक्यांच्या क्रुर विचारांना पाठींबा न देणार्‍यांची खुलेआम हत्या करतो.

हवाई हल्ल्यात ठार झालेला ईसिसचा डेप्युटी कमांडर अयाद अल-जुमाईली हा 2003 मध्ये ईसिस या अतिरेकी संघटनेत येण्यापुर्वी सद्दाम हुसेन यांच्या अधिपत्याखालील इराकी सेनेत इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून काम करत होता. सध्या इराकी सुरक्षा दल अन्य देशांच्या मदतीने युध्द छेडून ईसिसचा खात्मा करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. ईसिसच्या ताब्यात असलेल्या मोसुल शहरावर सतत हल्ले केले जात आहेत. अशाच प्रकारच्या हल्ल्यात ईसिसचा खतरनाक अतिरेकी अयाद अल-जुमाईली ठार झाला आहे.