पुणे । भारतासारखा लहरी हवामान असलेल्या ठिकाणाच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी अधिक अचूक डाटा अत्यावश्यक असतो. हा डाटा कोणत्याही अडथळ्याशिवाय नियमितपणे उपलब्ध व्हावा, यासाठी हवामान विभाग आता त्यांच्या सर्व स्वयंचलित हवामान केंद्रातील माहितीचे संकलन जीपीआरएस बेस असलेल्या मोबाईलद्वारे करणार आहे़ त्यामुळे त्यातील मानवी हस्तक्षेप कमी होऊन अधिक विश्वसनीय माहितीचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हवामानाचा अधिक अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे़
हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम विकसित
भारतातील किनारपट्टीवर नेहमीच चक्रीवादळाचा धोका असतो़ या काळात वार्यांचा वेग सर्वाधिक असतो. चक्रीवादळात अनेकदा घरे, वृक्ष उन्मळून पडतात़ अशावेळी वार्याच्या वेगाची अचूक मोजणी व्हावी, यासाठी हवामान विभागाने ‘हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम’ विकसित केली आहे़ सध्या ही पूर्व किनारपट्टीवरील 19 ठिकाणी लावण्यात आली आहे़ पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरील 70 जिल्ह्यांत ही सिस्टिम एका वर्षात लावण्यात येणार आहे़
विमानतळावर दृष्टी सेन्सर
विमानतळावर विमानांच्या उड्डाण व उतरतेवेळी वैमानिकांना तेथील हवामानाची अचूक माहिती मिळणे तसेच धावपट्टीवरील दृश्यमानता नेमकी किती आहे, याची माहिती महत्त्वाची असते. यासाठी हवामान विभागाने दृष्टी सेन्सर बनविले आहे. त्यासाठी बंगळुरूच्या नॅशनल एरोस्पेस लॅबबरोबर हवामान विभागाचा करार झाला आहे. देशातील विमानतळापैकी 20 विमानतळांवर सध्या हे सेन्सर बसविण्यात आले असून, या वर्षभरात आणखी 20 ठिकाणी असे सेन्सर बसविण्यात येणार आहेत़
देशभरात 1350 पर्जन्यमापन केंद्रे
हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे, तसेच देशभरात 1350 पर्जन्यमापन केंद्रे आहेत. या ठिकाणी वातावरणाची आर्द्रता, हवेचा वेग, जमीन तापमान अशी माहिती दर तीन तासांनी घेतली जाते़ सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़. यातील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यात सातत्य राहावे, यासाठी आता या सेंटरमध्ये मोबाईल चीप बसविण्यात येणार आहे. त्याद्वारे दर तीन तासांनी संकलित झालेला डाटा हा थेट पुण्यातील हवामान केंद्रामधील संगणकावर उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात झाली असून, मार्च 2019पर्यंत तो पूर्ण होणार आहे. हा डाटा उपलब्ध झाल्याने कृषी व सर्वसाधारण हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात अधिक अचूकता येणार असल्याची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ मनीष रनाळकर यांनी दिली.