मुंबई : हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज अनेकदा चुकीचे ठरत असल्याने राज्य सरकारला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी चुकीच्या हवामान अंदाजाचा फटका शेतकर्यांना बसत होता. परंतु, मुंबईत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारलाही त्याचा फटका बसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाले आहेत. त्यांनी पावसाच्या चुकीच्या अंदाजाबद्दल हवामान विभागाबद्दल, हवामान बदल आणि भूविज्ञान मंत्रालयाला नाराजीचे पत्र लिहिले आहे.
अतिवृष्टीऐवजी पडले ऊन
29 ऑगस्टरोजी मुंबईत अतिवृष्टी झाली. यानंतर पुन्हा दुसर्यादिवशी म्हणजे 30 ऑगस्टला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईतील सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. शिवाय, मुसळधार पावसाचा अंदाज घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही 30 ऑगस्टला मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र 30 ऑगस्टला पाऊस पडला नाही. दिवसभर चक्क ऊन पडले होते. सुट्टी दिल्यामुळे शासकीय कामाचा दिवस वाया गेला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाशी संबंधित केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.