वर्धा-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वर्ध्यात जाहीर सभा घेत आहे. मोदींनी त्यांच्या महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत बोलतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चांगलाच तोंडसुख घेतले. ‘पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूकीच्या मैदानातून पळाले. कारण त्यांना माहीत आहे. हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. भारतीय जनता पक्षाने भल्याभल्यांना मैदानातून पळवून लावल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी पवारांना टोला लगावला. ‘शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली’ असे जोरदार टोला मोदी यांनी पवार यांना लगावला.
पक्षातील नेत्यांचे धैर्य संपले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता खूप मोठे कौटुंबिक युद्ध सुरू झाले आहे. शरद पवार यांच्या हातातून पक्ष निसटत चालला आहे. आता हळूहळू पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहात असे असे अजित पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले. कौटुंबिक युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारांना तिकिटे देण्यातही अडथळे आले. कोणाला कुठली जागा द्यावी, कुठून लढावे हा मोठा प्रश्न पवारांपुढे उभा राहिला. यामुळे पक्षातील इतर नेत्यांचे धैर्य समाप्त झाल्याचेही मोदी म्हणाले.