उस्मानाबाद – एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यानंतर चर्चेत गेलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी संसद अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी रस्त्याने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. एअर इंडियाच्या कर्मचार्याला मारहाण केल्यामुळे त्यांना एअर इंडियासहित इतर एअर कंपन्यांनी काळ्या यादीत टाकलं असून त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आणली आहे.
रवींद्र गायकवाड आज कारने दिल्लीमध्ये पोहोचणार असून लोकसभेत मात्र हजेरी लावणार नाहीत अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसंच गुरुवारीदेखील लोकसभेत हजर राहायचं की नाही याबाबत पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असंही सुत्रांकडून समजलं आहे.
विमान प्रवास शक्य नसल्याने रवींद्र गायकवाड मुंबई ते दिल्ली रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता होती. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या नावे राजधानीमध्ये –3 कोचमध्ये जागाही आरक्षित असल्याचं दाखवलं होतं. मुंबई सेंट्र्लहून ही एक्स्प्रेस निघणार होती. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र गायकवाड यांनी कारने प्रवास सुरु केला आहे. कोणत्याही क्षणी ते दिल्ली पोहचू शकतात.