पाळधी येथील हॉटेलातील घटना
गावठी कट्टा , ४ काडतुसासह २ जणांना अटक
जळगाव– पाळधी येथे एका हॉटेलात जेवण करत असलेल्या सात ते आठ जणापैकी एकाला मारहाण करुन लुटण्याच्या उद्देशाने संशयितांनी हवेत दोन वेळा गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे गांभीर्य ओळखत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गोळीबार करणाऱ्या आकाश सुरेश सपकाळे (वय 21), विशाल लालचंद हळदे (वय 22 रा.) दोघे रा. कोळीपेठ रथचौक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर धरणगाव पोलिसात विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 1 फेब्रुवारी रोजी खासदार राहूल गांधी यांची धुळे शहरात प्रचार सभा होती. या सभेसाठी भुसावळ येथील सात ते आठ जण स्कॉर्पिओ गाडीने गेले होते. सभा आटोपून परतत असताना प्रवासात रात्री 9.30 वाजेच्या सुमारास कार्यकर्ते जेवणासाठी पाळधी येथील एका ढाब्यावर थांबले.
मारहाण करत लुटमार
सूत्रांनी सांगितल्यानुसार सात ते आठ कार्यकर्त्यांसोबत एक महिलाही होती. याच हॉटेलात आकाश सुरेश सपकाळे व विशाल लालचंद हळदेही बसले होते. त्यांनी जेवण करणार्या कार्यकर्त्यांना तसेच महिलेला बघितले. लुटपाट करण्याच्या उद्देशाने संशयित दोघांपैकी एक जण उठून जेवण करत असलेल्या कार्यकर्त्यांकडे आला. त्यापैकी डॉक्टर असलेल्या कार्यकर्त्यांला त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
दहशतीसाठी हवेत दोेन वेळा गोळिबार
मारहाण केल्यानंतर संशयिताने ग्राहकांना घाबरविण्यासाठी तसेच दहशतीसाठी हवेत दोन वेळा गोळीबार केला व त्यांच्याकडून मोबाईल तसेच काही पैसे हिसकावून लूट केली. याबाबत डॉक्टर नामक एकाने पोलिसांना कळविले. यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत माहिती मिळताच रात्री 11 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश जानकर, नारायण पाटील, बापू पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाणे, सुशील पाटील, प्रविण हिरोळे या पथकासह घटनास्थळ गाठले. व गावठी कट्टा व चार जीवंत काडतुसांसह आकाश सपकाळे व विशाल हळदे यांना ताब्यात घेतले.
गोळीबार करणारे दोघे सराईत गुन्हेगार
हवेत गोळीबाराचे वृत्त वार्यासारखे जिल्हाभर पसरले. स्थानिक गुन्हे शाखेचे गावठी कट्टा व संशयितांना ताब्यात घेतले. शनिवारी दुपारपर्यंत याप्रकरणी कु णाचीही तक्रार न आल्याने धरणगाव पोलिसात दोघांविरोधात विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना चार जीवंत काडतुस व गावठी कट्यासह अटक केल्याच्या घटनेला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी दुजोरा दिला आहे. मात्र नेमका प्रकार काय घडला, त्याबाबत तक्रार नसल्याने याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या दोघांवर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असुन ते सराईत असल्याची माहिती मिळाली आहे.