हवेलीला कालव्याद्वारे सांडपाण्याचा पुरवठा

0

पाणी शुद्धीकरणाचा विसर : विहिरी, कुपनलिकांचेही पाणी झाले अशुद्ध

लोणी काळभोर : पुणे महानगरपालिकेच्यावतीने जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीकरीता पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मुंढवा येथील जॅकवेलमध्ये या पाण्याचे शुद्धीकरण करून ते कालव्यात सोडण्याचे नियोजन होते. परंतु, अशी कुठलीही प्रक्रिया होत नसून थेट सांडपाणीच कालव्याद्वारे येत असल्याने पूर्व हवेलीतील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कालव्यात आलेले सांडपाणी विहिरी तसेच कुपनलिकांमध्ये उतरत आहे. यामुळे पूर्व हवेलीतील गावांचा शुद्ध पाण्याचा प्रश्‍न कायमच आहे. पुणे शहराला मुबलक पाणी मिळण्याकरिता शेतीचे एक आवर्तन कमी करण्यात आले आहे. पुणे महानगरपलिकेच्या सोयीकरीता हे नियोजन केले जात असताना याबाबतचे नियम मात्र दुर्लक्षीत केले जात आहेत.

कालव्यातील पाण्याला दुर्गंधी

मुंढवा येथील जॅकवेल प्रकल्पातून पाणी उचलून ते साडे सतरा नळी येथे शुद्धीकरण केले जाते आणि त्यानंतर ते जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पुरविले जाते, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या योजनेवरी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला असला तरी या पाण्यावर कुठलीच प्रक्रिया न करता हे सांडपाणी आहे कालव्यात सोडले जात असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. शेतीकरिता कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त आणि अरोग्यास हानीकारक असल्याने कालव्यालगतच्या गावांतील पाणी पुरवठा योजनांवरही याचा परिणाम झाला आहे. हे पाणी दूषित असल्यामुळे जुन्या कालव्याला आलेल्या विहिरी, कुपनलिकांतील पाणीही खराब झाले आहे. पीकांना पाणी वापरले तरी त्याचा परिणाम पीकांवरही दिसू येत आहे.

नियमाकडे दुर्लक्ष

खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांतील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी व जिल्ह्यातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील 66 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला पुरविले जाते. 1997 मध्ये झालेल्या करारानुसार सहा टीएमसी पाण्याच्या मोबदल्यात महापालिकेने सहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जुन्या मूठा उजव्या कालव्यादारे शेतीला पुरवावे, अशी कायदेशीर अट जलसंपदा विभागाने महापालिकेसोबत केलेल्या करारात नमूद केली आहे. परंतु, सोयीस्कररित्या या नियमाकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणांमी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवा

पूर्व हवेलीतून जुना आणि नवा असे दोन कालवे समांतर वाहतात. एका कालव्यातून धरणातील पाणी येत असले तरी त्या लगतच्या कालव्यात सांडपाणी वाहत असल्याने कालव्यालगतच्या विहरी, कुपनलिका यामध्ये हे दुषित पाणी झिरपते. यामुळे पिण्याचा पाण्याचाही प्रश्‍न गेली अनेक वर्षे कायम आहे. मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता आणखी वाढविण्याची गरज असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. शुद्ध पाणी पुरवठा करता येत नसेल तर किमान सांडपाणी तरी कालव्याला सोडू नका, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.