हस्ती भाजी-भाकर केंद्रामुळे सर्वसामान्यांना दिलासा

0

दोंडाईचा । 15 ऑगस्ट 2016 पासून सर्वसामान्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त दहा रुपयात भाजी- भाकर केंद्र सुरु असून त्याचा लाभ परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने घेत असून हस्ती परिवाराने केलेल्या उपक्रमाची शिंदखेडा तालुक्यात प्रशंसा होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी बांधव आपला शेतीचा माल विक्रीसाठी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असतो. बाजार समितीत माल विक्री झाल्यानंतर जवळपास सायंकाळपयर्ंत त्यांचा वेळ जातो. परिणामी बाहेरील जेवण महागाईच्या काळात पुरवडत नसल्याने ते हस्ती भाजी-भाकर केंद्रात फक्त दहा रुपयात जेवणाचा आनंद घेत असतात.

शेतकरी व कामगारांमध्ये आनंद
अडीचशे ग्रॅम बाजरीची भाकर व रोज निरनिराळया प्रकारची भाजी येथे मिळते. विशेष म्हणजे स्व.हस्तीमलजी जैन यांंनी 1971 साली भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी देखील त्यांनी जवळपास 1 वर्ष फक्त एक रुपयात भाजी-भाकर केंद्र सुरु केले होते. त्याची देखील परिसरातील जनतेला आठवण आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून दोंडाईचा शहरतील जैन परिवार असे उपक्रम नेहमी राबवित असते. विशेष म्हणजे या भाजी-भाकर केंद्राकडे कांतीलालजी जैन यांचे सुपूत्र अशोक जैन यांचे संपूर्ण लक्ष राहते. कांतीलाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगला उपक्रम सुरु असून या भाजी-भाकर केंद्रात पाच लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 11 पासून जेवणाचा लाभ शेतकरी घेत असतात. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.