प्रश्नांकडे पालिकेचे दुर्लक्ष : आयुक्तांना जाब विचारणार
हडपसर : हांडेवाडी रोड परिसरातील विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याकरीता शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट यांनी रास्ता रोको व धरणे आंदोलन केले. नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांची तक्रार आयुक्तांकडे करून जाब विचारण्याचा इशारा भानगिरे यांनी यावेळी दिला.
बडदे मळा येथील नैसर्गिक ओढा बुजवल्याने रस्त्यावर पाण्याचे तळे साचून नागरिकांचे हाल होतात. याठिकाणी पावसाळी लाईनचे काम व्हावे याकरीता वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन काम सुरू करत नाही, पाणी अनियमीत येते, दुषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हांडेवाडी रोडवर नो हॉकर्स झोनची अंमलबजावणी होऊन रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी यावेळी नगरसेवक नाना भानगिरे यांनी केली.
नष्क्रिय अधिकार्यांची तक्रार करणार
पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी जनआंदोलनाची साधी दखलही घेत नाही. नागरिकांना होणारा त्रास पाहण्यास यांना वेळ नाही, अशा निष्क्रिय वरिष्ठ अधिकार्यांची आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा यावेळी नगरसेवक भानगिरे यांनी दिला. कनिष्ठ अभियंता भूषण सोनवणे, पाणीपुरवठा अधिकारी तपन चिकने, मलनिस्सारण अधिकारी गणेश पुरम, पथ विभाग कनिष्ठ अभियंता अविनाश कामठे या मनपा अधिकार्यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून 10 दिवसात सर्व नागरी समस्या सोडवू, स्वच्छ पाणीपुरवठा नियमीत सुरू करू, पावसाळी वाहिन्यांचे कामही सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आशिष आल्हाट, शिवा शेवाळे, नाना तरवडे, बापू शिंदे, संतोष भानगिरे, अशोक आल्हाट उपस्थित होते.