स्वीकारला एमएसआरडीसीचा व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार
मुंबई : बोरिवली येथील भूखंड स्वस्तात विकल्याचा तसेच बांधकाम व्यावसायिक सतीश मांगले यांना धमकवल्या प्रकरणी आरोप झाल्यानंतर भ्रष्टाचाराच्या हकालपट्टी करण्यात आलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत दाखल झाले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी क्लिनचीट मिळाल्याने मोपलवार यांनी पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी एमएमआरडीसीच्या व्यवस्थापकीय पदाचा पदभार आपण स्वीकारल्याची माहिती मोपलवार यांनी दिली आहे.
वादग्रस्त समृद्धी महामार्ग प्रकल्पाला विरोध करणार्या शेतकऱ्यांच्या व्हॉटसअप ग्रुपवर काही महिन्यांपूर्वी मोपलवारांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर मोपलवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोपलवार यांच्याविरोधात चौकशी लावत त्यांची हकालपट्टी केली होती.
ऑडिओ क्लिपची तपासणी केली असता या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड केल्याचा अहवाल राज्य सरकारच्या चौकशी समितीने काही दिवसांपूर्वी देत मोपलवार यांना दिलासा दिला होता. राज्याचे माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या एकसदस्यीय समितीने त्यांना या आरोपांमधून क्लिनचिट दिली होती. त्यानुसार मोपलवार यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. मोपलवार यांचा चौकशीचा हा 145 दिवसांचा कालावधी रजेचा कालावधी मानून सामान्य प्रशासन विभागाने त्यांची रजा मंजूर करत पुन्हा मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मोपलवार यांच्या फेरनियुक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी प्रकल्पाला गती येईल अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.