जळगाव । हागणदारीमुक्तीबाबत अचानक पहाणी करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) समिती शहरात सकाळीच दाखल झाली आहे. या समितीमध्ये मुंबई अतिरीक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उल्हासनगर उपायुक्त जमीर लेंगरेकर, अनिल पाटील, दुर्गा भड, राहूल खंडारे या पाच सदस्यांचा समावेश आहे. आहेत. दोन दिवस शहरात पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाला देणार आहे. समितीतर्फे मनपाने उघड्यावर शौचास जाणार्या भागाची यादी तयार केली आहे का, सार्वजनिक शौचालयाची उभारणी केली आहे का, तसेच किती नागरिकांना शौचालयाचे अनुदान देण्यात आले आहे याची माहिती घेत आहेत.
जनजागृती केली नसल्याचे मत
महानगरपालिका स्वच्छतेचा दावा करीत असतांना समितीने शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे. शाहू नगर येथील जळकी मिल परिसराला समितीने पाहणी केली. यापरिसरातील स्वच्छता बघून समितीने समाधान व्यक्त केले आहे. स्थानीक नागरिकांनी जागृती दाखवून उघड्यावर शौचास बसणार्यांना अटकाव करीत आहेत. तसेच कानळदा रस्त्यांवर साफसफाई केली असल्याचे समितीला आढळून आले. समितीने विविध भागांना भेट देण्यात आली. सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान तांबापुरा ते फुकटपुरा येथून पहाणीस सुरूवात केली. समता नगर, इच्छा देवी चौक येथे पहाणी केली. दिलीप ठाकरे याला उघड्यावर शौचास बसल्याने दंड करण्यात आला.
मनपा शाळांमध्ये अस्वच्छता
मनपा उर्दू शाळा क्र. 10, चौबे शाळा यांच्या परिसरात घाण असल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली.शाळांमध्ये चाळीस विद्यार्थ्यांसाठी एक सिट असणे तसेच मुतारी असणे आवश्यक आहे. मात्र, महानगर पालिकेच्या शाळांना समितीने भेट दिल्यावर स्वच्छतेबाबत या शाळांमध्ये दयनीय अवस्था असल्याचे मत समितीने मांडली आहे. मनपाच्या शाळांमधील स्वच्छतेबाबत शिक्षक, मुख्याध्यापक, प्रशासन अधिकारी गंभीर नसून शाळेच्या आवारात गुटखा खावून धुंकणे, पत्ते खेळणे यासारखे प्रकार घडत असल्याचे समितीच्या निर्देशनास आले आहे. महानगर पालिका प्रशासन शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी केलेले प्रयत्न अपूर्ण असल्याचे मत समितीने मांडले आहे.