हागणदारीमुक्त बोदवड शहरासाठी सरकारकडून मोठी तरतूद

0

बोदवड। स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त बोदवड शहराची संकल्पना साकार करण्यासाठी शहरात जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम आणि त्याचा वापर होणे गरजेचे आहे. यासाठी नगरपंचायतीने सुरू केलेल्या प्रयत्नांना सरकारकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरात 1 हजार 216 वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनाने 1 कोटी 45 लाख 92 हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.

पालिकेच्या उत्पन्नात पडणार 5 ते 7 कोटींची भर
वर्षभरापूर्वी निर्मिती बोदवड नगरपंचायतीने शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. एकीकडे शहरात जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत स्वत:चे उत्पन्न वाढवण्यासाठी नगरपंचायतीने स्वत:च्या मालमत्ता नियमानुसार लिलावाद्वारे करारपत्र करून भाड्याने देण्याच्या हालचाली चालवल्या आहे. यामुळे पालिकेच्या वार्षिक उत्पन्नात सरासरी पाच ते सात कोटी रुपयांची भर पडेल. कर उत्पन्नातून शहरात आवश्यक कामे करता येतील.

नाशिक विभागात सर्वाधिक निधी
दरम्यान, बोदवड शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी शहरात 2हजार 151 वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 935 शौचालयांसाठी शासनाने 14व्या वित्त आयोगातून 1 कोटी 12 लाख 23 हजारांचे अनुदान दिले होते. त्यातून सुरू झालेली कामे अंतिम टप्प्यात आहे. यानंतरच्या दुसर्‍या टप्प्यात शासनाने उर्वरित 1216 वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी 1 कोटी 45 लाख 92 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नाशिक विभागात सर्वाधिक जास्त निधी मिळवणारी बोदवड नगरपंचायत एकमेव आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी हा निधी मिळावा यासाठी मुख्याधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.

पहिला टप्पा यशस्वी
वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्याला एकूण 17 हजारांचा निधी दिला जातो. शिवाय होणारे बांधकाम योग्य दर्जानुसार होत आहे किंवा नाही? शौचालय बांधकाम झाल्यावर त्याचा वापर होतो किंवा नाही? अशा मुद्द्यांवर अचानक पडताळणी केली जाते. घराघरात स्वच्छतेची सवय लागून शहर हागणदारीमुक्त व्हावे, असा यामागील उद्देश आहे. दुसर्‍या टप्प्यातील लाभार्थी निवडीसाठी सध्या यादी तयार करण्याची लगबग सुरू आहे. नगरपंचायतीने वैयक्तिक शौचालय बांधकामाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी पालिकेला पाच जिल्ह्यांत सर्वाधिक निधी प्राप्त झाला.