जळगाव। हागणदारीमुक्तीबाबत अचानक पहाणी करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान समिती शहरात गुरूवार 23 मार्चपासून शहरात आली आहे. या समितीमध्ये मुंबई अतिरीक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उल्हासनगर उपायुक्त जमीर लेंगरेकर, अनिल पाटील, दुर्गा भड, राहूल खंडारे या पाच सदस्यांचा समावेश असून यातील चार सदस्यांनी भेट दिली आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्थापाहून समितीने नाराजी व्यक्त केली आहे. शहर हागणदारीमुक्तीचा आढावा घेतला असता अस्वच्छता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. समितीने महापौर नितीन लढ्ढा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. याप्रसंगी उपमहापौर ललित कोल्हे, विरोधी गट नेते सुनील माळी, नगरसेवक सुनील महाजन, श्यामकांत सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे आदी उपस्थित होते. या भेटीत त्यांनी शहराचा हागदारीमुक्तीकडील प्रवास कठीण असल्याचा ताशेरे ओढले. जनजागृतीबाबत कोणताही उपाय योजना करण्यात येत नसल्याचे यावेळी निर्देशनास आणून दिले. शहर हागणादारीमुक्त झाले नाही तर महानगर पालिकेला शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात येणार आहे.
ड्रेनेजव्यवस्था योग्य नसल्याचे मत
महानगर पालिकेच्या शाळांना समितीने भेट दिल्यावर स्वच्छतेबाबत या शाळांमध्ये दयनीय अवस्था असल्याचे मत समितीने मांडले आहे. ड्रेनजेची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आलेली नसल्याचे यावेळी समितीने सांगितले. तसेच आरोग्य विभागाद्वारे योग्य ती उपाय योजना करण्यात येत नसून शहर हागणदारीमुक्त होण अशक्य असल्याचे स्पष्ट मत समितीने व्यक्त केले आहे. आरोग्य विभाग हा स्वच्छेतेबाबत गंभीर नसल्याचे सांगितले. उघड्यांवर शौचास जाणार्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी उघड्यावर शौचास जाणे बंद झाले नसल्याचे निर्देशनास आणून दिले. सार्वजनिक शौचालयांशेजारील उकरीड्यांवर डुक्कर घाण करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.