हाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात

12 हजारांची लाच भोवली : नाशिक एसीबीच्या कारवाईने खळबळ

धुळे : हाडाखेडा चेक पोस्टवरून ओडीसी वाहतूक करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी आरटीओच्या खाजगी एजंटांनी शासकीय फी चार हजार असताना 12 हजारांची मागणी करीत लाच स्वीकारताच दोघा एजंटांना अटक करण्यात आल्याने आरटीओ वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवार, 24 रोजी शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आली. जयपाल प्रकाशसिंग गिरासे (35, रा.शिरपूर, जि.धुळे) व छोटू भिकन कोळी (34, रा.पळासनेर, ता.शिरपूर, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना रविवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात आरटीओ अधिकार्‍यांचीदेखील चौकशी होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

कारवाईने उडाली खळबळ
31 वर्षीय तक्रारदारांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. त्यांना आरटीओ चेकपोस्ट हाडाखेड येथून ओडीसी वाहतूक करण्याच्या परवानगी मिळवून देण्यासाठी दोघा आरटीओ एजंट यांनी स्वतःसह आरटीओ अधिकार्‍यांसाठी 12 हजारांची मागणी गुरुवार, 22 जुलै रोजी केली होती मात्र प्रत्यक्षात त्याची शासकीय फी केवळ चार हजार असल्याने तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताच दोघा आरोपींना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक साधना इंगळे, हवालदार पंकज पळशीकर, नाईक वैभव देशमुख, नाईक अजय गरुड, नाईक प्रभाकर गवळी, चालक संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.