चाळीसगाव । तालुक्यातील रोकडे येथे रस्त्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या शारदाबाई पाटील (वय 38) यांचे आज बुधवारी धुळे येथे उपचार घेतांना निधन झाले. दरम्यान संशयीतांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह धुळ्याहून थेट चाळीसगाव ग्रामिण पोलिस स्टेशनला आणल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिस उपनिरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
रस्त्याच्या कारणावरून झाली हाणामारी
रोकडे येथे 25 ऑगस्ट रोजी रस्त्याच्या कारणावरून हाणामारी झाली. मुलांना होत असलेली मारहाण पाहता त्यांची आई शारदाबाई पाटील (वय-38) या मध्ये पडल्या. त्यांना जोरात ढकलल्याने त्या डोक्यावर पडून जखमी झाल्यात. त्यांनी त्वरीत उपचारासाठी धुळे येथे नेण्यात आले. दरम्यान याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. धुळे येथे उपचार घेत असतांना शारदाबाई यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.
मृतदेह नेला पोलिसात
महिलेचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी संशयीतांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी व आत्तापर्यंत पोलिसांनी संशयीतांवर कोणतीही करावाई न केल्याने सदर महिलेचा मृतदेह पोलिस स्टेशनला रूग्णवाहिकेतून आणला गेला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तापले होते. मृत महिलेच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार संशयीतांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पेटारे यांनी दिले.