जळगाव। तालुक्यातील आव्हाणे गावी पूर्ववैमनस्य व शेतात बकर्या व गुरे चरायला नेल्याच्या कारणावरून दोन गटात 4 रोजी वाद होवून हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यानंतर याप्रकरणी तालुका पोलिसात अॅट्रॉसिटी व दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता.
तर आज बुधवारी दंगलीच्या गुन्ह्यातील तीनही संशयितांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना न्यायाधीश आर.डी. सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तिघांना न्यायालयात केले हजर
आव्हाणे येथे दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारी होवून दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत गावातील जवळपास 10-12 जखमी झाले असून तालुका पोलिसांनी वेळीच गावात धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिसात अॅट्रॉसिटी व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात येवून पहिल्या गटातील सहा तर दुसर्या गटातील तीन असे 9 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच शेतात बकर्या व गुरे चरायला नेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तालुका पोलिसात दाखल असलेल्या दुसर्या गुन्ह्यात दत्तात्रय तुळशीराम पाटील यांच्या फिर्यादीवरून 11 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी सुनिल पानाचंद भालेराव, संजय भिका सपकाळे, आनंदा बळीराम सपकाळे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होेते. व त्यांना 7 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज बुधवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता तिघांना न्यायाधीश आर.डी.सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. निखिल कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस न्यायालयीन कोठडी
जळगाव। शिरसोली येथे 11 जून 2016 रोजी वादातून पतीने पत्नीचा खून केला होता. त्यानंतर पती गावातून फरार होता. त्याला एमआयडीसी पोलिसांनी रविवारी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून अटक केली. त्यानंतर त्याला 7 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावलण्यात आली होती. बुधवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता संशयिताला न्या.बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिरसोली येथील खताबाई बाळू पवार (वय 45) यांचा 11 जून 2016 रोजी त्यांचा पती बाळू किसन पवार (वय 50) याने किरकोळ वादातून रामदास पाटील यांच्या शेतात खून केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून केल्यानंतर बाळू पवार हा फरार होता. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक विजय आढाव, दादासाहेब वाघ, दीपक चौधरी, निलेश भावसार यांना तपासासाठी पाठविले होते. तो मनमाड येथे असल्याची माहिती कुराडे यांना मिळाली होती. रविवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी त्याला मनमाड रेल्वे स्थानक आवारातून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज बुधवारी बाळू पवार याच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्याला पोलिसांनी न्यायाधीश बी.डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, न्या. गोरे यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.