जळगाव – शहरातील ट्रॅफीक गार्डन परिसरात यासीन शेख शरीफ यांच्या बिर्याणीच्या हातगाडीवर अनिस नईम भिस्ती उर्फ खान, जाकीर बेग सद्दाम बेग, आरीफ शेख उर्फ आरीफ खान अजगर व शेख शाबुद्दीन शेख कुदबुद्दीन उर्फ भुरा या कचार टवाळखोरांनी वाद घातला होता. उधारीचे पैसे न देता उलट या जागेवर व्यवसाय करण्यासाठी दररोज ३०० रुपयांची मागणी भामट्यांनी केली होती. या वादातून त्यांनी शेख यांना मारहाण करुन त्याच्या खिशातील २ हजार ७५० रूपये काढून घेतले होते. १४ मे २०१७ रोजी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अनिस भिस्ती, जागीर बेग व आरीफ शेख यांना अटक करण्यात आली होती. तर शेख शाबुद्दीन हा बेपत्ता झाला होता. पोलिसांनी शनिवारी रात्री शाबुद्दीन याला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे अॅड.सुप्रिया क्षिरसागर यांनी काम पाहिले. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आराक हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.