जळगाव : शहरातील भिलपुरा चौकीजवळी मनपा शाळा क्रंमाक 28 जवळून जाणार्या हातगाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. हा वाद पोलीस ठाण्यात आल्यानंतर देखील दोन्ही गट पोलीस ठाण्याच्या समोरच हाणामारी करत होते. पोलीसांना अखेर लाठीचा दम दाखवून त्यांना पळवून लावले. मात्र, या घटनेत भाजीपाला विके्रता जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेप्रकरणी पोलीसांनी तिन जणांना ताब्यात घेतले आहे.
मनोज प्रकाश कोळी (वय-३० रा. कांचन नगर) हा भाजीपाला विके्रता असून सकाळी त्याने भिलपुरा चौकीजवळ गाडी लावली होती. मात्र, अतिक्रमणाची गाडी आल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सर्व मनोजसह इरत हातगाड्याधारकांनी आजू-बाजूच्या गल्ली-बोळांमध्ये गाड्या नेल्या. यानंतर मनोज हा पुन्हा भिलपुरा चौकीजवळ असलेल्या महानगर पालिकेच्या शाळा क्रंमांक २८ जवळून जात होता. त्यावेळी मनोज गवळी हा तेथून जात असतांना त्याच्या हाताला हातगाडीचा धक्का लागला. यावेळी गवळी याने मनोजशी वाद घालून त्याला मारहाण केली. तर त्याच वेळी गवळी याचा मुलगा त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानेही मनोज कोळी याला लाथा-बुक्क्यांनी मारले. तर १ किलोचे माप डोक्यात मारले. यात मनोज हा जखमी झाला. मनोजच्या मित्रमंडळींना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले.
यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले. परंतू, दोन्ही गट पोलीस ठाण्यासमोर आल्यामुळे दोघांमध्ये शिवीगाळ होवून पुन्हा हाणामारी झाली. पोलीस ठाण्यासमोरच तरूण हाणामारी करीत असल्याचे समजताच पोलीसांनी धाव घेत त्यांच्यावर लाठीमार करीत त्यांना तेथून पळवून लावले. तर एका गटातील एक जणाला तर दुसर्या गटातील किसन कोळी व रवि कोळी या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. घडलेल्या घटनेत भाजीपाला विक्रेता मनोज हा जखमी झाल्याने त्याला पोलीसांनी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यानंतर मनोज यांने मनाजे गवळी व बंटी गवळीसह एक जण अशांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. तर बाळू सुरेश गवळी (वय-३४) यांनीही मनोज कोळी व इतर दोन जणांविरूध्द मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.