एमआयडीसी परिसरातील घटनाः एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : हातातील मोबाईल कानाला लावून रस्त्याने मित्राला भेटण्यासाठी जात असलेल्या तरुणासह एकाचा अशा दोन जणांच्या हातातून हिसका देवून मागून दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी मोबाईल लांबविल्याची घटना 21 रोजी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.
नितीन साहित्यानगरातील सागर अपार्टमेंट येथे प्रमोद राजेंद्र सुर्यवंशी (वय-23) हा तरुण कुटुंबासह वास्तव्यास आहे. प्रमोद हा 21 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास काम आटोपून मित्र रितेश कोळी याला भेटण्यासाठी हॉटेल सुमेरसिंग ढाब्याजवळ मोबाईलवर बोलत जात होता.
यादरम्यान त्याच्या पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञात भामट्यांनी उजव्या हाताला हिसका देवून 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकाविला. यानंतर दोघेही कुसुंबा गावाकडे फरार झाले होते. प्रमोदने दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते भरधाव वेगाने निघून गेले.
काही अंतरावर दुसर्याचाही मोबाईल लंपास
थोड्या अंतरावर जावून एका व्यक्तीचा देखील पायी जात असतांना त्यांचाही हातातून मोबाईल हिसकावून या दोन्ही चोरट्यांनी लंपास केल्याचे समजले. दरम्यान दोन जणांचे मोबाईल चोरून नेणारे एकच असल्याचे संशय आहे. दोघेही 25 ते 30 वयाचे तरुण असून प्रमोदने दोघांचे वर्णन पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी प्रमोद सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.