पुणे । मार्केटयार्डात रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसची आवक वाढली असून रविवारी रत्नागिरी हापूसची 10 हजार पेटी तर कर्नाटक हापूसची 40 हजार पेट्यांची आवक झाली असून दरात तब्बल 20 ते 30 टक्क्यांनी आवक घटली आहे. बाजारात आंब्यांना मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, गेल्या 15 दिवसांच्या तुलनेत आवक वाढल्याने आंब्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
आगामी काळात आंब्याच्या दर घसरण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी आंबा खाण्याची हीच योग्य वेळ आहे.गुलटेकडी मार्केटयार्डातील फळ बाजारात रत्नागिरीहून रविवारी 10 हजार तर कर्नाटकातून तब्बल 50 हजार हापूसच्या पेट्या आणि बॉक्सची आवक होत आहे. 15 दिवसांपुर्वी रविवार वगळता इतर दिवशी ही आवक कमी प्रमाणात होत होती. यावेळी, रत्नागिरी हापूसच्या प्रति 4 ते 8 डझनाच्या कच्च्या आंब्यास 2 ते 4 हजार तर कर्नाटक हापूसच्या 4 डझनाच्या पेटीस 1 हजार 200 ते 1 हजार 800 रुपये भाव मिळत होता. तयार आंब्याचा भाव यापेक्षा पाचशे तेहजार रुपयांनी जास्त होता.
गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत बाजारात रत्नागिरी हापूसची आवक मोठ्या प्रमाणात वाढली रविवारी बाजारात 10 ते 12 हजार पेट्यांची आवक होत आहे. तर इतर दिवशी इतर दिवशी 7 ते 8 हजार पेट्यांची आवक होत आहे. ही आवक येत्या मे अखेरपर्यंत सुरू राहील. त्यानंतर, आवक घटण्यास सुरवात होईल. असे रत्नागिरी हापूसचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. सध्या आंब्याला मिळत असलेले दर हे सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. यंदा, आंबा बागांना ओखी वादळ आणि हवामान बदलाचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे, आंब्याचे दर आणखी खाली उतरण्याची शक्यता कमी असून आंब्याची गोडी चाखण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही मोरे यांनी नमूद केले.
आंब्याच्या दरात घट
सध्या रत्नागिरी कच्च्या आंब्याच्या प्रति 4 ते 8 डझनाच्या पेटीस 800 ते 2 हजार तर तयार मालास 1 हजार 500 ते 2 हजार 500 रुपये दर मिळत आहे. कर्नाटकातील हापूस आंब्यासही 4 डझनास 600 ते 1 हजार रुपये, तर पायरीच्या चार डझनास 400 ते 700 रुपये दर मिळत आहे. याखेरीज, लालबाग, बदाम व मलिका 20 ते 50 रुपये दर मिळत आहेत. गेल्या 15 दिवसांच्या तुलनेत या आंब्याच्या दरातही 20 ते 30 टक्कयांनी घट झाल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.