हापूस आंब्याचा दर 100 रुपये डझनपर्यंत उतरला

0

रत्नागिरी – फळांचा राजा हापूस आंबा आता केवळ 100 रूपये डझनापर्यंत उतरला आहे. यावर्षीच्या हंगामातील मे महिन्यातील हे शेवटचे फळ आहे. पावसाची लवकर चाहून लागल्याने जे फळ उपलब्ध आहे, ते लवकरात-लवकर संपवण्याकडे व्यावसायिक व व्यापाऱयांचा कल आहे. त्यामुळे आता हापूस आंब्याचा दर 100 रूपये डझनपर्यंत उतरला आहे.

मे महिन्याचे शेवटचा आठवडा आहे. तसेच पाऊसही दररोज येण्याची वर्दी देत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी बाजारपेठेत मोठया प्रमाणात हापूस आंब्याची आवक वाढली आहे. विठ्ठल मंदिर येथे बाजारपेठेत व्यापाऱयांची मोठी गर्दी दिसून येत आहे. हापूसचे सर्वसाधारण छोटे फळ 100 रूपये डझन, त्याहून थोडे मोठे फळ 125 ते 150 रूपये डझनने विक्रीला उपलब्ध झाले आहेत.

हापूसचे दर उतरल्याने खवैय्यांचीही मजा झाली आहे. त्यामुळे हापूस आंबा शौकीन मुबलक आंबे खरेदी करत असल्याने हापूसला आता चांगला उठाव मिळत आहे. मोसमातील शेवटचे फळ घेण्यासाठी खरेदीदारांचीही गर्दी दिसून येत आहे. हापूसबरोबर रायवळ आंबेही विक्रीस आहेत. ते सुमारे 50 रूपये डझनाने उपलब्ध आहेत. डझनच्या दराबरोबर हापूस आंबा पेटीचा दरही घसरला आहे. बाजारपेठेत पेटीचा दर हजार रुपयांच्याही खाली आला आहे. याचबरोबरच शेकड्यावर आंबा खरेदी केला जात आहे.