चिपळूण । फळांचा राजा आंबा असे उगाच म्हटलेले नाही. देशात आणि विदेशातही सिझनमध्ये आंबा खाल्ल्याशिवाय स्वस्थ वाटत नाही. परंतू अजूनही सामान्यांच्या जीभेपर्यंत पोहचलेला नाही. एप्रिल अखेर आंब्याला चांगला दर मिळत असल्यामुळे हापूस आंब्याचा दर सर्वसामान्यांसाठी अजूनही आवाक्याबाहेर आहे. मे महिन्यात कमी दरातील हापूसची चव सर्वसामान्यांना चाखता येईल, अशी शक्यता आहे. बागेतून काढणी झालेला आंबा बाजारात विक्रीसाठीही आला आहे.
पिकलेल्या आंब्याचा दर 250 ते 300 रुपये डझन
सध्या 2 हजार रुपये शेकडा दराने स्थानिक बाजारपेठेत आंब्याची विक्री सुरू आहे. मोठ्या आकाराचे डझनावर विकले जात आहेत. जिल्ह्याबाहेर पाठविताना आठ दिवसांनंतर पिकणार्या हापूस आंब्याचे दर अद्यापही 500 रुपये डझन आहेत. पिकलेला आंबा 250 ते 300 रुपये डझन दराने विकला जात आहे. यावर्षी हापूसची फळधारणा चांगली होती. काही भागात उष्णतेच्या झळा बसल्यामुळे तयार झालेला हापूस आतून करपला गेला. फेब्रुवारीला फळधारणा झालेला हापूस या उष्णतेपासून वाचला. दमट वातावरण वगळता उरलेल्या काढणी फळाला कोणताही धोका नसल्यामुळे बागायतदारांनी आंब्याचे चांगले उत्पादन घेतले. बाजारात दीड महिन्यापूर्वीच हापूस दाखल झाला आहे. त्याचे दर सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. एप्रिलअखेर आंब्याचे दर कमी होतात. व्यापारी राहिलेला आंबा स्थानिक बाजारपेठेत कमी किमतीत विकतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हापूस आंब्याची चव चाखता येते.
देशभरात हापूसला चांगली मागणी
यावर्षी आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मुंबई, पुण्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागात हापूसला चांगली मागणी असल्यामुळे बागायतदार अद्यापही स्थानिक बाजारपेठेत उतरलेले नाही. चांगल्या दर्जाचा आंबा बाहेर पाठविला जात आहे. लहान फळ असलेल्या आंब्याची 2 हजार रुपये शेकडा दराने स्थानिक बाजारपेठेत विक्री सुरू आहे. बाहेरून आलेले पर्यटक व खरेदीदार पैशाच्या उपलब्धतेनुसार खरेदी करीत आहेत. मात्र, स्थानिकांना आंब्याचे दर अद्यापही आवाक्याबाहेर वाटत आहेत.