पाकमध्ये सार्वत्रिक निवडणूक एकत्र लढविणार
कराची : पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी पाकमधील 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदसोबत युती करण्याची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. हाफिज सईदसोबत निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले असून, पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी ही माहिती दिली. मुशर्रफ यांनी आपण लष्कर-ए-तोयबाचा सर्वात मोठा समर्थक असल्याचे काही दिवसापूर्वीच म्हटले होते.
मी त्यांचे स्वागत करेन!
परवेझ मुशर्रफ यांना दहशतवादी हाफिज सईदसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुशर्रफ म्हणाले, आतापर्यंत त्या लोकांशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र ते जर युतीचा भाग होणार असतील, तर मी त्यांचे स्वागत करेन. गेल्या महिन्यात मुशर्रफ यांनी एका मोठ्या युतीची घोषणा केली होती. त्यामध्ये सुन्नी तहरीक, मजलिस-ए-वहातुदुल मुसलिमीन, पाकिस्तान अवामी तहरीक आणि मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगसह दोन डझन पक्षांचा समावेश होता. मात्र मुशर्रफ यांच्या घोषणेनंतर लगेचच दुसर्याच दिवशी अनेक बड्या पक्षांनी या महायुतीमधून अंग काढून घेतले होते.
पुराव्यांअभावी हाफिजची सुटका
आठवड्यापूर्वी हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर त्याने 2018 मध्ये सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. मात्र हाफिजने तो नेमका कुठून निवडणूक लढणार हे स्पष्ट केलेले नाही. जमात-उद-दावाने ऑगस्ट महिन्यात मिल्ली मुस्लीम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची आठवड्याभरापूर्वी न्यायालयाने नजरकैदेतून मुक्तता केली. हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्याची मागणी पाकिस्तान सरकारने केली होती. मात्र पुराव्यांअभावी त्याची नजरकैदेतून सुटका झाली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिजला अमेरिकेने दहशतवादी घोषित केले आहे.