हायटेक तंत्रज्ञानामुळे महावितरणच्या ग्राहकांना मिळणार प्रभावी सेवा

0

बारामती । माहिती तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करीत कर्मचार्‍यांना स्मार्ट बनविण्याचा महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांचा प्रयत्न आता प्रत्यक्षात उतरला आहे. यातूनच महावितरणने आपल्या सर्व कर्मचार्‍यांसाठी ’डॅशबोर्ड’ आणि ’एम्प्लॉई मित्र’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून माहितीची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या कल्पनेतून दीड वर्षांपूर्वी ग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅप लॉन्च करण्यात आले. या अ‍ॅपच्या माध्यमातुन माध्यमातून कर्मचार्‍यांचे दैनंदिन कामकाज सुलभ होऊन ग्राहकांना प्रभावी सेवा मिळणार आहे. कोणत्याही उपक्रमात कर्मचार्‍यांच्या समाधानावर ग्राहकांचे सौख्यही बहुतांशी अवलंबून असते. कर्मचार्‍यांच्या दैनंदिन कामातील अधिकची सुलभता ही ग्राहकांच्या परिणामकारक सेवेत परावर्तित होते. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे कर्मचार्‍यांसाठी डॅशबोर्डसह मोबाईल अ‍ॅपवर या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

डॅशबोर्ड या प्रणालीमुळे महावितरणची सर्व माहिती अचूक व एकसमान मिळणार आहे. यातून विविध अंतर्गत विभागातून येणार्‍या माहितीतील त्रुटी दूर होतील. महावितरणमधील कामकाजाशी संबंधित सर्व घटक माहितीबाबत एका समान पातळीवर आल्याने जलद विचार करून अचूक निर्णय व या निर्णयाची प्रभावी अंबलबजावणी शक्य होणार आहे. या माहिती व विश्‍लेषणाचा उपयोग करून आपापल्या कार्यक्षेत्रातील वितरण, वाणिज्यिक हानी, थकबाकी यासह विविध त्रुटींवर अधिक लक्ष केंद्रित करून परिणामकारक काम शक्य होणार आहे.

25 लाख वीज ग्राहकांनी घेतला लाभ
आतापर्यंत 25 लाख 58 हजार वीज ग्राहकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले असून अ‍ॅपची अचूकता व पारदर्शकता लक्षात घेत संजीव कुमार यांच्याच प्रयत्नातून कर्मचार्‍यांसाठी मोबाईल अ‍ॅप व डॅशबोर्ड या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा वापर करून कर्मचार्‍यांनी त्यांचे दैनंदिन कामकाज सुलभ करून घ्यावे यासाठी संजीव कुमार आग्रही आहेत. त्यानुसार राज्यभरातील कर्मचार्‍यांना या सुविधेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

कर्मचार्‍यांसाठी महत्वपुर्ण सुविधा
डॅशबोर्ड ही कर्मचार्‍यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी सुविधा असून यात विविध माहिती ऑनलाईन व एकत्रितपणे उपलब्ध होणार आहे. ग्राहकांची आकडेवारी व यादी, त्यांच्या तक्रारी, दिलेले वीज बिल, ग्राहकांनी केलेला भरणा, जमा झालेली रक्कम, थकबाकी या सर्वांची माहिती व या माहितीचे विश्‍लेषण महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध असेल.

ऑनलाईन कार्यवाही
मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कर्मचार्‍यांना सर्व वैयक्तिक सुविधा तर बहुतांश कार्यालयीन कामकाज हाताच्या बोटावर उपलब्ध झाले आहे. दरमहाचे पगारपत्रक, भविष्य निर्वाह निधीची माहिती, विविध भत्यांसाठी (टीए, डीए) अर्ज व मंजुरी, रजेसाठीचा अर्ज व ऑनलाईन मंजुरी, शिस्तभंग कारवाई प्रलंबित असल्यास तिची स्थिती, सेवाज्येष्ठता यादी, बदलीसाठीचा विनंती अर्ज अशा सर्व वैयक्तिक सुविधा मोबाईल अ‍ॅपमधून मिळणार आहेत. तर या अ‍ॅपमधून केलेल्या अर्जावर वरिष्ठ अधिकार्‍यांनाही विहित मुदतीत ऑनलाइन कार्यवाही करावी लागणार आहे. या वैयक्तिक सुविधांशिवाय दैंनदिन कामकाजाबाबतच्या वरिष्ठांच्या सूचना किंवा निर्देशही अ‍ॅपवरून मिळण्याचे नियोजन करण्यात येत आहे.