हायटेन्शन वायरच्या स्पर्शाने भावंडे भाजली

0

नागपूर : नागपुरात बिल्डरच्या चूकीमुळे आणि त्याकडे महावितरण आणि महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे जुळ्या भावंडाना मृत्यूशी झुंझ द्यावी लागत आहे. नागपूरमध्ये राहणारे अकरा वर्षांचे प्रियांश आणि पियुष विजेचा जोरदार शॉक लागल्याने भाजले आहेत. घराला चिटकून गेलेल्या महावितरणच्या हाई टेन्शन लाईनमुळे ही घटना घडली आहे.

1 जून रोजी दोघे भावंडे सुगतनगर परिसरातील आरमोर्स टाउनशिपमध्ये त्यांच्या डुप्लेक्सच्या बाल्कनीमध्ये प्लास्टिक बॉलने क्रिकेट खेळत होते. त्यांचा बॉल शेजारच्या लिंबाच्या झाडावर अडकला. दोघांनी बाल्कनीमध्ये ठेवलेला एल्युमिनियमचा रॉड घेऊन झाडाला हालवून बॉल खाली पाडण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्यांच्या हातातल्या रॉडचा स्पर्श चुकून त्यांच्या घराला चिटकून जाणार्‍या हायटेन्शन इलेक्ट्रिक वायरला झाला आणि जोरदार स्फोट झाला. स्फोट एवढा मोठा होता, की धर कुटुंबियांच्या डुप्लेक्सच्या भिंतीला तडे जाऊन भिंत काळी पडली. स्फोटात दोन्ही भावांना जोरदार वीजेचा शॉक बसला. या घटनेत दोघेही 45 ते 50 टक्के भाजले गेले. तेव्हापासून रुग्णालयात दोघांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. एका मुलाचे हात तर एवढे वाईटरित्या भाजले गेले आहेत की ते निकामी होतील की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

मुळात आरमोर्स टाउनशिप बनली तेव्हाही महावितरणची ही हायटेन्शन लाईन त्या ठिकाणी होती. घराला चिटकून असलेल्या इलेक्ट्रिक वायर संदर्भात नागरिकांनी अनेक वेळेला बिल्डरकडे पाठपुरावा केला. मात्र आजपर्यंत बिल्डरने नेहमीच त्यांची दिशाभूल केली. निराश झालेल्या नागरिकांनी महावितरणकडे अनेक वेळेला तक्रार केली. यात हायटेन्शन लाईन घरांपासून थोड्या अंतरावर नेण्याची किंवा त्याला इन्सुलेशन पाईप मधून नेण्याची विनंती केली. मात्र, महावितरणनंही आजवर यात लक्ष घातलं नाही. अखेर त्याची किंमत दोन चिमुकल्याना मोजावी लागली आहे.