’हायवे’वर दारुबंदीच्या आदेशात बदल

0

नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर 500 मीटरच्या परिसरात दारुविक्रीवर बंदी घालण्याच्या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बदल केला. 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या भागात 220 मीटरपर्यंत दारुविक्रीवर बंदी असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सुधारीत आदेशात म्हटले आहे. 20 हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या परिसरात 500 मीटरमध्ये दारु विकता येणार नाही, असे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले.

15 डिसेंबर 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या 500 मीटरच्या परिसरात दारुविक्रीवर बंदी घातली होती. दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे रस्ते अपघात होतात. हीच बाब ध्यानात घेऊन दारुबंदीचा आदेश देण्यात आला होता, असे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि एल. एन. राव यांनी स्पष्ट केले. 15 डिसेंबरच्या आदेशानुसार 1 एप्रिलपासून महामार्गालगतची दारु दुकाने बंद होतील. 220 मीटरचा नवा आदेश महामार्गासह सिक्कीम, मेघालय आणि हिमाचल प्रदेश या डोंगराळ राज्यांनाही लागू आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.