‘हार्ट फेल‘चा धोका टळला; शुकदास महाराजांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा!

0

औरंगाबाद/ बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष तथा कोट्यवधी रुग्णांना व्याधीमुक्त करणारे कुशल धन्वंतरी पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या प्रकृतीत बुधवारी किंचितशी सुधारणा झाली. त्यांचा रक्तदाब आता स्थीर झाला असून, हृदयाचे ठोकेही पूर्वपदा वर आले आहेत. अंगात कमालीचा अशक्तपणा असला तरी त्यांचे शरीर औषधोपचाराला प्रतिसाद देत आहेत. महाराजांना असलेला ‘हार्ट फेल‘चा धोका आता टळला असून, उच्च आत्मशक्तीच्या बळावर महाराजांनी हृदयरोगावरही विजय मिळवला आहे. गुरुवारी त्यांना अतिदक्षता कक्षातून (आयसीयू) बाहेर काढले जाईल. महाराजांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती सेठ नंदलाल धूत रुग्णालयाचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर यांनी लाखो भाविकांसाठी जारी करण्यात आलेल्या व्हिडिओ संदेशाद्वारे दिली.

अशक्तपणा असला तरी प्रकृती ठीक
पूज्यनीय शुकदास महाराजांना औरंगाबादेतील सेठ नंदलाल धूत रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज्यभरासह देशभरातून त्यांच्या प्रकृतीची विचारणा होत असून, विवेकानंद आश्रम सचिवालयासह आश्रम पदाधिकार्‍यांचे दूरध्वनी सातत्याने खणखणत आहेत. तसेच धूत रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे महाराजांच्या प्रकृतीची माहिती देणारा व्हिडिओ संदेशच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर यांनी जारी केला. या व्हिडिओत पूज्यनीय महाराज कमालीचे अशक्त दिसत असले तरी वैद्यकीयदृष्ट्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवत आहे. महाराजांचे हृदय, मूत्रपिंड आता ठिकठाक काम करत असून, त्यांची कृत्रिम श्‍वसन प्रणाली काढण्यात आलेली आहे. तसेच, दिवसातून दोनवेळा डायलेसिस करावे लागत आहे. तथापि, रक्तदाब व हृदयाचे ठोके नियमित असल्याचेही डॉ. मगरकर यांनी सांगितले.

गावोगावी सामूहिक प्रार्थना
पूज्यनीय शुकदास महाराज यांना मानणारा मोठा लोकसमुदाय पहाता, त्यांच्या प्रकृतीविषयी अनेकांचे काळजी करणारे दूरध्वनी सातत्याने येत आहेत. त्यामुळे थेट रुग्णालयातील व्हिडिओ संदेश बुधवारी सोशल मीडियाद्वारे सार्वजनिक करण्यात आला. विदर्भ व मराठवाड्यातील प्रसारमाध्यमांनी पूज्यनीय महाराजश्रींच्या प्रकृतीचे वृत्तांकन करून भाविकांना दिलासा दिला असला तरी, राज्यातील इतर भागातील भाविकांसह राज्याबाहेरील भाविकांना पुरेशी माहिती प्राप्त होत नसल्याने त्यांची काळजी वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत प्रकृतीची माहिती पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठा हातभार लागला आहे. डॉ. मगरकर यांच्यासह डॉ. प्रवीण लाठी, डॉ. सलिम, डॉ. मुनीर अहमद, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ डॉ. शेखर शिरढोणकर आदी वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक पूज्यनीय शुकदास महाराज यांच्यावर उपचार करत आहेत. महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी विदर्भात अनेक ठिकाणी प्रार्थना करण्यात आली. गावोगावी सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहांमध्येदेखील सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.