हार्दिक पटेल पुन्हा अडचणीत
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल याने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. हार्दिकला अडचणीत आणण्यासाठी त्याचे कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची मालिकाच सुरू असून, त्याचे पुन्हा पाच कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशाप्रकारे सेक्स व्हिडिओ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून व्हायरल केला जाणार आहे, असे हार्दिकने पहिला व्हिडिओ येण्यापूर्वीच सांगितले होते.
मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत
गुजरात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना बुधवारी संध्याकाळी हार्दिकचे हे नवे कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले. त्यात हार्दिक त्याच्या मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असून हे व्हिडिओ 29 मेरोजी रेकॉर्ड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याआधीच्या दोन व्हिडिओमध्ये हार्दिक मित्र-मैत्रिणींसह दारू पिताना दिसला होता. हे व्हिडिओ पाटीदार समितीचे संयोजक रवी पटेल यांनी शूट केल्याची चर्चा होती. मात्र, या प्रकरणानंतर रवी पटेल गायब झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मागील व्हिडिओची चर्चा अद्याप थांबलेली नसताना दुसरे व्हिडिओ आल्याने हार्दिकची चांगलीच अडचण झाली असून, विरोधकांनी त्याला संपविण्यासाठीच हा कट रचल्याचा आरोप हार्दिकच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप
हार्दिक पटेलची बदनामी करण्यासाठी भाजप हे सगळे घडवून आणत आहे. हे व्हिडिओ खरे नसल्याने मीडियाने ते दाखवू नयेत, असे आवाहन पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या नेत्यांनी केले आहे. हे व्हिडिओ बनावट असून भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप पाटीदार नेत्यांनी केला आहे.