नवी दिल्ली । बडोद्याचा युवा क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला अष्टपैलू बिरुद लागले, हेच खूप आहे. पण, त्याच्या सर्वसाधारण खेळात आणि कपिलच्या महान खेळात जमीन-अस्मानाचा फरक असून या कपिलशी त्याची तुलना अजिबात करू नका, अशा स्पष्ट शब्दात माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी अनेकांना फटकारले. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकन दौर्यात पंड्या सातत्याने अपयशी ठरला असून या पार्श्वभूमीवर बिन्नी यांनी आपला संताप व्यक्त केला. यंदा पंड्याने केपटाऊन येथील पहिल्या कसोटीत 93 धावांची तडफदार खेळी जरुर साकारली. पण, नंतर पुढील 5 डावात त्याला 1, 15, 6, 0 व 4 अशा किरकोळ धावांवरच समाधान मानावे लागले. याशिवाय, त्याला केवळ तीनच बळी घेता आले. त्यानंतर वनडे मालिकेत भारताने 5-1 अशा फरकाने जरूर एकतर्फी बाजी मारली. पण, त्यातही पंड्याचे योगदान यथातथाच राहिले. त्याला 6 सामन्यात 8.66 च्या सरासरीने केवळ 26 धावा जमवता आल्या व केवळ 4 गडीच बाद करता आले. त्या पार्श्वभूमीवर बिन्नी बोलत होते.
पंड्या फलंदाजीच्या आघाडीवर अजिबात दखलपात्र योगदान देत नाही. त्यामुळे या परिस्थितीतही तो अष्टपैलू म्हणून ओळखला जातो, हेच खूप होते. आता गोलंदाजीच्या आघाडीवर उत्तम योगदान देत असल्यामुळेच त्याला संघातील जागा कायम राखता आली आहे, असे ते पुढे म्हणाले. मला स्वतःला पंड्यामध्ये कपिलचा एकही गुण दिसत नाही. कपिल कसोटी संघात आला, त्यापूर्वीच त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शतके झळकावली होती. पण, पंड्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यापूर्वी प्रथमश्रेणीत फारशा धावाच केलेल्या नाहीत. त्याला कसोटी संघात स्थान मिळाले ते त्याच्या टी-20 क्रिकेटमधील भरीव योगदानामुळेच. अर्थात, मर्यादित षटकांचे क्रिकेट हे कसोटीपेक्षा खूप वेगळे असते आणि क्षेत्ररक्षण पांगवले गेले असल्याने तेथे सहज धावा जमवल्या जाऊ शकतात, याचा बिन्नी यांनी उल्लेख केला.