हालेपला हरवून कोंटाची उपांत्य फेरीत धडक

0

लंडन ।  वर्षातील तिसर्‍या ग्रॅण्डस्लॅम विम्बल्डंन स्पर्धेत ब्रिटनची स्टार टेनिसपटू जोहाना कोंटाने महिला एकेरीच्या लढतीत अंतिम 8 जणांमधील लढत जिंकून 40 वर्षानंतर पुन्हा एकदा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवणारी ब्रिटनची पहिली खेळाडू ठरली आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सहावे मानांकन मिळालेल्या कोंटाने सेंटर कोर्टवर झालेल्या लढतीत रोमानियाच्या सिमोना हालेपची कडवी लढत तीन सेटमध्ये 6-7, 7-6, 6-4 अशी मोडून काढली. या गटातील अन्य लढतींमध्ये 10 वे मानांकन मिळालेल्या अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने फ्रेंच ओपन विजेत्या लॅटिव्हीयाच्या एलेना ओस्तापेंकाचे आव्हान 6-3, 7-5 असे संपुष्टात आणले.

वर्जिन वेडने गाठली होती उपांत्य फेरी
सन 1978 मध्ये ब्रिटनच्या वर्जिन वेडने विम्बल्डंनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून नंतर ही स्पर्धा जिंकली होती. आता 40 वर्षानंतर कोंटाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले असून अंतिम फेरीत जाण्यासाठी तिला व्हीनस विल्यम्सचा अडथळा पार करावा लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत कोंटाने हालेपवर मिळवलेल्या विजयामुळे महिलांच्या यादीत मोठी उलथापालथ झाली आहे. पराभूत झाल्यामुळे जर्मनीच्या एंजेलिक कर्बरला मागे टाकून नंबर वन बनण्याची हालेपची संधी हुकली. कॅरोलिना प्लिस्कोवा नंबर वन झाली आहे.