नंदुरबार – कोलकाता येथील कोरोना रुग्णाचा हावडा एक्स्प्रेसमधेच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नंदुरबार स्थानकात रेल्वे आल्यावर उघड झाली. यामुळे त्या रुग्णासमवेत प्रवास करणारी पत्नी आणि लहान दोन मुले पार हादरुन गेले. तथापि त्या सैरभैर परिवाराच्या मदतीला नंदुरबार रेल्वे स्थानकातील अधिकारी आणि कार्यकर्ते वेळीच धावून आले व धीर दिला. एवढेच नाही तर कोविड लागणीचा धोका पत्करत मृतदेह हाताळला. यथोचित अंतिमसंस्कार करण्याचे तसेच त्या परिवाराला सुखरुप परतीच्या प्रवासाला पाठवण्याचे कार्य देखील पार पाडले आणि माणुसकीचे निराळे दर्शन घडवले.
अधिक वृत्त असे की, पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील रहिवासी आनंद कोदाड (वय ४२) हे अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने स्लीपर श्रेणीतून पत्नी सोमा आणि नैतिक व सहेली या दोन लहान मुलांसमवेत प्रवास करीत होते. ही अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस दि.२८ एप्रिल रोजी सकाळी ७.३५ वाजे दरम्यान नंदुरबार रेल्वेस्थानकात पोहोचली. तेव्हा सोमा कोदाड यांनी धावत येऊन रेल्वे कर्मचार्यांना गाठले. कोरोनामुळे आजारी असलेल्या आपल्या पतीची प्रकृती अत्यावस्थ झाली असल्याने तातडीने उपचार मिळवून द्या; अशा विनवण्या केल्या. तेव्हा नंदुरबार रेल्वेस्थानकावरील अधिकारी प्रमोद ठाकूर आणि अन्य कर्मचार्यांनी लगेचच धावपळ करून कोदाड परिवाराला रेल्वे डब्यातून स्थानकात उतरवून घेतले. सॅनेटाईज करून गाडी पुढे रवाना करण्यात आली. स्थानकावरील वैद्यकीय अधिकार्यांना पाचारण करून तपासणी केली. तेव्हा वैद्यकीय अधिकार्यांनी आनंद कोदाड हे मृत झाल्याचे घोषित केले. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. घरी परतण्याच्या प्रवासाला निघालेला आपला पती अचानक जग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्याचे कळताच त्या महिलेवर जणू आकाश कोसळले. कोणीही परिचयाचे सोबत नसतांना अनोळखी गावात कोसळलेल्या या संकटसमयी काय करावे? कायदेशीर पुर्तता कशा कराव्या? लहान मुलांना सांभाळून आता पतीच्या मृतदेहाची पुढील गती कशी लावावी? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहिले. तथापि प्रमोद ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी पूर्ण धीर देत अभ्यागत कक्षात त्यांना बसवून धीर दिला. दरम्यान, ही घटना कळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण कोविड समितीचे गिरीष बडगुजर, त्यांचे सहकारी,सामाजिक कार्यकर्ते केतन रघुवंशी अन त्यांचे सहकारीही धावून आले. दुर्दैव असे की, कोरोना रुग्णाचा मृतदेह हाताळायला सर्व साधनांचा बंदोबस्त असलेला जाणकार आरोग्य कर्मचारी कोणीही उपस्थित नव्हता. कोविड रुग्णाचा मृतदेह असल्याने उपस्थित अन्य कोणीही हाताळायला तयार नव्हते. यामुळे बराच वेळ गेला. अखेर कोणतेही प्रतिबंधक बंदिस्त कपडे नसतांना केवळ हॅण्डग्लोज चढवून केतन रघुवंशी, प्रमोद ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वत: तो मृतदेह उचलून स्ट्रेचरवर ठेवला. दोन प्लाटफार्म ओलांडून रेलेवेस्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणण्यासाठी भर उन्हात परीश्रम घेत धावपळ केली. नंतर शासकीय रुग्णालयाला त्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूची माहिती देत शववाहिनी मागवली. तो पर्यंत सवा बारा वाजले होेते. एवढेच नव्हे तर मृतदेह योग्य तर्हेने बंदिस्त करून अंतिमविधी उरकणे, त्यासाठी लागणार्या कायदेशीर नोंदी, कागदपत्रांची पूर्तता करणे या साठीची धावपळ केतन रघुवंशी यांनी सायंकाळपर्यंत पार पाडली. तर प्रमोद ठाकूर यांनी सोमा कोदाड यांना मुलांसह सुखरुप कोलकाताला जाण्यासाठी परतीच्या प्रवासाची सोयही करून दिली. कोविड रुग्णाची हाताळणी करणे म्हणजे आपला जीव दावणीला बांधण्याची जोखीम माहित असतांनाही कोदाड परिवारावर अनाहूतपणे आलेल्या या संकटात माणुसकीचा हात पुढे करून मानवतेचे उदाहरण घालून दिल्याबद्दल या मित्रांचे कौतूक केले जात आहे. दरम्यान, नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रशस्त कोविड सेंटर नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. तरीही कोविड रुग्ण किंवा त्याचे शव वाहून नेण्यासाठी लागणारी पुरेशी साधने आणि कर्मचारी या घटनेप्रसंगी का उपलब्ध होऊ शकले नाहित? असा प्रश्न केला जात आहे. एकीकडे रेल्वे प्रवासाला निघालेल्या रेल्वेप्रवाशांची स्थानकावरच तपासणी बंधनकारक करणारा आणि पॉझिटिव व्यक्तींना प्रवासबंदी करणारा नियम जाहीर केला गेला आहे. मग हा प्रकृती खालावलेला कोरोना रुग्ण थेट अहमदाबादपासून इतक्या लांबचा प्रवास कसा काय करू शकला? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेल्वेस्थानकांवरील तपासणी व्यवस्थेवर यामुळे प्रश्नचिन्ह उमटले आहे.