मुंबई : पैसा काढण्यासाठी नागरिकांना रांगेत उभे राहवे लागत आहे. त्यामुळे आता रांगेत उभे राहणे हा राष्ट्रीय कार्यक्रम झाल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हेमराज शहा यांनी आज शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
नागरिकांची आर्थिक कोंडी
शेतकर्यांच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर नाही. त्यांचा जमा असलेला पैसा करमुक्त आहे. मात्र, जिल्हा बँकांवर निर्बंध लावून त्यांचीही या सरकारने आर्थिक कोंडी केल्याचे ते म्हणाले.आता खासगी अॅक्सिस बँकेचा घोटाळा समोर येतो आहे. त्या बँकेला तर क्लिन चिट देऊन टाकली आहे. सरकारने जाहीर करावे की आता जिल्हा बँकांवर निर्बंध लावून ते पुढे शेतकर्यांवर आयकर लावणार आहेत, असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला. राहुल गांधी म्हणतात, मला संसदेत बोलू दिले जात नाही. मोदी म्हणतात, मला बोलू दिले जात नाही. पण, नागरिक समजूतदार आहेत. जर राहुल गांधी म्हणत असतील की, पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत तर त्यांनी ते जनतेसमोर मांडावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.