हा आमचाच नव्हे तर जनतेचा विजय आहे – ममता बॅनर्जी

0

नवी दिल्ली : कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करु नये, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला हा आमचाच नव्हे तर जनतेचा विजय आहे. आपण सहकार्य करणार नसल्याचं राजीव कुमार यांनी सीबीआयला कधीही म्हटलं नव्हतं. तर यासंदर्भात पाच पत्रे त्यांनी सीबीआयला लिहीली आहेत, त्यामुळे ही केस आमच्याच बाजूने आहे, असा दावा करताना मोदी बिग बॉस नव्हेत तर लोकशाही व्यवस्था देशाची बिग बॉस आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली.

ममता बॅनर्जी सध्या सीबीआयच्या कारवाईविरोधात धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी एकमेकांचा आदर राखायला हवा. केंद्राचे आणि राज्याचे स्वतंत्र कायदे असून यामध्ये एकमेकांची ढवळाढवळ व्हायला नको. अशा प्रकारे जर संविधान मोडण्याचं काम केलं तर देशात कोणतंही राज्य चालू शकणार नाही.

देशात सध्या हुकुमशाहीचे वातावरण आहे. मोदी सरकार आम्हाला निधी देत नाही, काम करु देत नाही, आमच्या लोकांना, इथल्या लोकांना त्रास देतंय, कधीपर्यंत हे सहन करणार. मोदींविरोधात काहीही बोलू नका असे अनेक फोनही आमच्या सारख्या राजकीय लोकांना येत आहेत. मात्र, आता आम्ही शांत राहणार नाही. ही हुकूमशाही मोडीत काढणार असून २०१९ मध्ये मोदी पुन्हा निवडून येणार नाहीत, असेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.