जयपूर हे राजस्थानच्या राजधानीचे शहर अनेक पर्यटनस्थळांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळातील मुख्य मानला जाणारा आमेर फोर्ट हा केवळ भव्यतेच्या दृष्टीनेच नाही तर सौंदर्याच्या दृष्टीनेही अजोड मानला जातो. सम्राट अकबराच्या नवरत्नांतील एक राजा मानसिंह यांनी या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले होते व तब्बल 100 वर्षे हा किल्ला बांधला जात होता. राजा मानसिहांनतर त्यांचा मुलगा जयसिंहने हे बांधकाम पुढे सुरू ठेवले होते.
या महालाचे एकूण बांधकाम अतिशय भव्य व कलात्मक पद्धतीने केलेले आहे. 40 खांबांवर उभारलेल्या भव्य शीशमहालाचे सौंदर्य तर महालाला चार चाँद लावणारे मानले जाते. महालाच्या भिंती, छत व जमिनीवर आरशांची अशी वेलबुट्टी काढली गेली आहे की त्यावरून नजर हटविणे मुश्कील बनते. हा महाल थंडीत राजाचे निवासस्थान असे. येथे एक काडी पेटवली तर अवघा महाल उजेडात उजळून निघतो.
मावढा सरोवराकाठी बांधला गेलेला हा किल्ला त्याच्या भव्य प्रवेशद्वारामुळे प्रथम नजरेत भरतो. राजाच्या 12 राण्यांसाठी येथे डोली महल बांधला गेला होता व त्याचा आकार पालखी अथवा डोलीसारखा आहे. येथे असलेला भुलभुलैय्या खासच. असे सांगतात राजा जेव्हा युद्धावरून परतत असे तेव्हा पहिल्यांदा कुठल्या राणीकडे जाणार याचा फैसला येथे होत असे. म्हणजे राजा येण्याच्या वेळी राण्या भुलभुलैय्यात फिरत असत व जिची राजाबरोबर पहिली भेट होईल तिच्या महालात राजा जात असे.
उन्हाळ्यातही महाल थंड राहावा म्हणून येथे खास योजना केली गेली आहे. सरोवरातील पाणी महालांवरच्या टाक्यात आणले जात असे. या पाण्याचे फवारे खिडक्यांवर सोडले जात व हवेमुळे पाण्याचे तुषार महालांच्या खिडक्यातून आत येत व गारवा मिळत असे. या महालात देवीचे मोठे मंदिर असून ती या राजांची कुलदेवता आहे. तिच्या प्रसादात मद्य दिले जाते.