.. हा तर क्रिकेटचा चेस मास्टर

0

दुबई । भारताने श्रीलंकेच्या दौर्‍यात कसोटी मालिका 3-0, एकदिवसीय क्रिकेट मालिका 5-0 आणि एकमेव टी 20 क्रिकेट सामना जिंकला. भारताच्या या 9-0 अशा किल्नस्विपनंतर ट्विटरवर भारतीय संघाचे अभिनंदन करण्याची शर्यत सुरू झाली आहे. शेवटच्या टी 20 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणार्‍या भारताच्या स्टार खेळाडूला चेस मास्टर बनण्याचा किताब मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्टार खेळाडू विराट कोहलीचे नामकरण चेस मास्टर असे केले आहे. भारतीय संघाने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशानंतर सोशल साइट्सवर क्रिकेट चाहत्यांच्या जोडीने भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोपडा, मोहम्मद कैफ, आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनीही संघाचे अभिनंदन करताना हात आखडता घेतलेला नाही. विराटने एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात 30 वे शतक ठोकून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या 30 शतकांची बरोबरी साधली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या शर्यतीत आता केवळ सचिन तेंडुलकर पुढे असून त्याच्या नावावर 49 शतके जमा आहेत.

कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रारूपांमध्ये 15 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो 33 वा आणि भारताचा सातवा फलंदाज आहे. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 60 सामन्यांमधून 4658 धावा केल्या आहेत. 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 8587 धावा केल्या आहेत आणि 50 टी 20 सामन्यांमध्ये विराटने 1830 धावा केल्या आहेत. टी 20 सामन्यात विराटने 30 चेंडूंमध्ये 17 वे अर्धशतक पूर्ण केले. आपल्या 50 व्या टी 20 सामन्यात अर्धशतक झळकवणारा तो चौथा फलंदाज आहे.

विराट टि 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडचा फलंदाज ब्रँडन मॅकुलमला (1006) मागे टाकले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज आहे. विराटच्यापुढे ब्रॅडन मॅकुलम (2140) आणि तिलकरत्ने दिलशान (1889) आहे.

सर्वात प्रथम 1000 धावा
विराटने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये शतकं ठोकून 2017 मध्ये प्रथम 1000 धावांचा पल्ला पार केला आहे. विराटने यावर्षी 18 सामन्यांमधून 92.45 च्या सरासरीने 1017 धावा केल्या आहेत. त्यात चार शतके व सहा अर्धशतकांचा समावेश आहे.