नवी दिल्ली : भाजप खासदार विनय कटियार यांनी मुस्लीम नागरिकांनी या देशात राहू नये असे वक्तव्य केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी कटियार यांच्या बापाचा देश नसल्याचे म्हटले आहे. कटियार यांच्या बापाचा हा देश आहे का? हा देश आपल्या सर्वांचा आहे.
अशा प्रकारची वक्तव्ये करून असे लोक देशात द्वेष पसरवत आहेत. भारतातील सर्व धर्म हे प्रेम आणि शांतीचा संदेश देतात, असे अब्दुल्ला म्हणाले. भाजपचे खासदार विनय कटियार यांनी मुस्लिमांनी भारतात राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही. त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. उत्तर प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष कटियार यांनी, मुस्लीम समाज त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर देशाचे विभाजन करत असल्याचा दावा केला होता.