हा महागडा खेळाडू भारतात खेळणार

0

मुंबई । 17 वर्ष गटाची फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा आता अगदी तोंडावर आली आहे. फुटबॉल जगतातील बलाढ्य देशांच्या युवा आणि मुख्य म्हणजे भविष्यातील रोनाल्डो, मेस्सी यांचा खेळ जवळून बघण्याची संधी भारतातील फुटबॉलप्रेमींना मिळाली आहे. ख्रिस्तीयानो रोनाल्डो, मेस्सी, वेन रूनी आणि इतर बड्या फुटबॉलपटूंना मिळणार्‍या घसघशीत रकमेचे आकडे आपण ऐकलेच आहेत. पण अवघ्या 16 वर्षे वयाच्या फुटबॉलपटूसाठी स्पेनमधील आघाडीचा फुटबॉल क्लब असलेल्या रेआल माद्रिदने जुलै 2018 पर्यंतचे अधिकार मिळण्यासाठी सुमारे चार कोटी 50 लाख युरो मोजण्याची तयारी दाखवली असेल तर काय म्हणाल? हे सत्य आहे. ब्राझीलचा वंडरकिड म्हणून ओळखल्या जाणार्‍या विनीशीयस ज्युनिअरसाठी रेआल माद्रिदने आपली तिजोरी सताड उघडली होती. या गोष्टीची आठवण एवढ्यासाठीच की हा विनिशीयस विश्‍वचषक स्पर्धा खेळण्यासाठी ब्राझिलच्या राष्ट्रीय संघातून भारतात येणार आहे.

भारतीयांना आठवण येईल
ब्राझिलचा हा खेळाडू भारतात खेळणार असल्याबद्दल विश्‍वचषक स्पर्धेचे संचालक झेव्हियर सेप्पी म्हणाले की, 17 वर्ष गटाची फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा ही नेहमीच भविष्यातील सितार्‍यांना बघण्यासाठी खेळली जाणारी स्पर्धा ठरली आहे. विनीशियस ज्युनिअरने याआधीच आपल्या खेळाने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ज्युनिअर गटातील त्याच्यासारख्या दर्जेदार खेळाडूला जवळून बघणे हे भारतीयांसाठी विशेष असेल.भविष्यात, मी त्याला पहिली विश्‍वचषक स्पर्धा खेळताना जवळून पाहिले असे कोणा भारतीयाने म्हटले तर आश्‍चर्य वाटणार नाही.

सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
सेप्पी म्हणाले की, ऑक्टोबर महिन्यात अनेक सितारे भारतात येणार आहे. विनिशियस ज्युनिअर हा त्यापैकी एक आहे. फुटबॅलप्रेमींसाठी ही चांगलीच संधी आहे. मार्चमध्ये झालेल्या 17 वर्ष गटाच्या लॅटिन अमेरिकन फुटबॉल स्पर्धेत ब्राझिलला विजेतेपद मिळवून देण्यात विनिशियसने मोलाची भूमिका बजावली होती.यात विनिशियसने सात गोल केले. त्याची कामगिरी त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात महत्वपूर्ण ठरली.